Aruna Visit of Chief Engineer of Water Resources | जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्याची अरुणा प्रकल्पस्थळी भेट
जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्याची अरुणा प्रकल्पस्थळी भेट

ठळक मुद्देजलसंपदा विभागाचे मुख्य अभियंत्याची अरुणा प्रकल्पस्थळी भेटसंतप्त प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची केली मागणी

वैभववाडी : जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एस. आर. तिरमनवार यांनी अरुणा प्रकल्पस्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या संतप्त प्रकल्पग्रस्तांनी त्यांची भेट घेत प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी केली.

प्रकल्पाची घळभरणी झाल्यानंतर धरणाच्या पाण्यात काही प्रकल्पग्रस्तांची घरे बुडाली. याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच प्रकल्पग्रस्तांना २३ मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त विविध प्रकारे जूनपासून संघर्ष करीत आहेत.

गेल्या महिन्याभरात प्रकल्पग्रस्तांनी सातत्याने दे धडक, बेधडक आंदोलन, मुंडण आंदोलन, श्राद्ध आंदोलन, घेराओ अशाप्रकारच्या आंदोलनांद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, प्रशासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद प्रकल्पग्रस्तांना मिळताना दिसत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धरणाचे कोणतेही काम यापुढे होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यासाठी कोणत्याही स्वरुपाचा संघर्ष करावा लागला तरी त्यांची तयारी त्यांनी केली आहे.

दरम्यान, प्रकल्पग्रस्तांनी जिल्हा दौऱ्यावर असलेले जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तिरमनवार यांची अरुणा प्रकल्पस्थळी भेट घेतली. तत्पूर्वी प्रकल्पग्रस्तांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे वातावरण काहीसे तापले होते. मुख्य अभियंत्यांनी प्रकल्पग्रस्तांना बोलवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपण सूचना करूनदेखील अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांनी प्रकल्पग्रस्तांची बैठक का बोलविली नाही? असा प्रश्न उपस्थित केला. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत; तोपर्यंत प्रकल्पाचे काम करू नये अशी मागणीदेखील प्रकल्पग्रस्तांनी यावेळी केली.

Web Title: Aruna Visit of Chief Engineer of Water Resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.