अनिकेत कोथळे हत्याप्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालणार - दीपक केसरकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 21:57 IST2017-11-11T21:54:30+5:302017-11-11T21:57:07+5:30
सांगली येथील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात आतापर्यंत १२ पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.

अनिकेत कोथळे हत्याप्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालणार - दीपक केसरकर
सावंतवाडी - सांगली येथील अनिकेत कोथळे हत्या प्रकरणात आतापर्यंत १२ पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. गरज पडल्यास या प्रकरणात सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांचीही भूमिका तपासली जाईल. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करू, असा स्पष्ट इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. ते ‘लोकमत’शी बोलत होते. हे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविले जाईल, असे सांगत प्रकरणाचा तपास सीआयडी योग्य पद्धतीने करीत आहे. त्यामुळे सीबीआयकडे देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री दीपक केसरकर हे शनिवारी एक दिवसाच्या सिंधुदुर्ग दौºयावर आले असता त्यांनी सावंतवाडी येथील निवासस्थानी ‘लोकमत’शी संवाद साधला. यावेळी केसरकर म्हणाले, सांगलीतील घटना दुर्दैवी आहे. त्याची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या घटनेला जबाबदार अशा पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. तेथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातले आहे. मी सुद्धा रविवारी सांगलीला भेट देणार आहे. कोथळे यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात सध्यातरी दोषी पोलिसांवर कारवाई झाली आहे. मात्र अन्य कोण दोषी आहेत याची खातरजमा करणे सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. कोणालाही आम्ही सोडणार नसल्याचे केसरकर यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांची भूमिकाही या प्रकरणात तपासली जाईल. शासनाने अद्यापपर्यंत वेगळी समिती सांगलीला पाठविली नाही. हा तपास सीआयडी करीत असून योग्य पद्धतीने तपास सुरू आहे. त्यांना वेळ दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कोथळे यांच्या कुटुंबीयांनी काही तक्रारी केल्या आहेत. त्याबाबतही निश्चित चौकशी करू तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावे अशी कुटुंबीयांनी मागणी केली आहे. त्यांची मागणी निश्चित मान्य केली जाईल. मात्र विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची मागणी केली आहे. त्याबाबत निकम यांची वेळ बघितली जाईल. त्यानंतर त्यांना विनंती करू. यावर आताच निर्णय घेणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मृत अनिकेत कोथळे यांची मुलगी लहान आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांना मानवतेच्या दृष्टीने कसा न्याय देता येईल तो पाहिला जाईल. सांगलीत आतापर्यंत अशी दुसरी घटना घडली आहे. पण ती घटना वेगळी होती. आता घडलेली घटना वेगळी आहे. पण पोलिसांनी कायद्याचे रक्षक म्हणून वागले पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.
आंबोली पोलीस दूरक्षेत्र इतरत्र हलविणार
आंबोली पोलीस दूरक्षेत्र ज्या ठिकाणी आहे तेथून अन्य मार्ग आहे. त्यामुळे कधी कधी पोलिसांचे दुर्लक्ष होते. त्यामुळे पोलीस दूरक्षेत्र अन्य जागेत हलविण्याबाबत पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करू तसेच आंबोली पोलीस दूरक्षेत्रावर पोलिसांची संख्याही कमी आहे. ती वाढविण्याबाबत आजच्या आज आदेश दिले जातील, असे यावेळी केसरकर यांनी सांगितले. बंद सीसीटीव्ही लवकरच सुरू केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी वाहन तपासणी कशी केली नाही याची चौकशी
सांगलीहून आंबोलीपर्यंत म्हणजेच तब्बल दोनशे किलोमीटर मृतदेह आणण्यात आला. हा मृतदेह आणताना कुठेच तपासणी करण्यात आली नाही याचीही चौकशी केली जाईल. ही घटना गंभीर आहे. पोलिसांनी मुद्दामहून हे केले की कोणाला माहितीच नव्हते याचीही खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.