प्रियकर दुसऱ्या मुलीशी बोलतो, संतप्त प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न; सावंतवाडीतील घटना
By अनंत खं.जाधव | Updated: November 1, 2023 16:29 IST2023-11-01T16:07:24+5:302023-11-01T16:29:44+5:30
सावंतवाडी : प्रियकर दुसऱ्याच मुलीशी बोलत असल्याच्या रागातून प्रेयसीने मोती तलावात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी नागरिकांनी तिला परावृत्त ...

प्रियकर दुसऱ्या मुलीशी बोलतो, संतप्त प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न; सावंतवाडीतील घटना
सावंतवाडी : प्रियकर दुसऱ्याच मुलीशी बोलत असल्याच्या रागातून प्रेयसीने मोती तलावात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी नागरिकांनी तिला परावृत्त केले. ही घटना आज, बुधवारी सकाळच्या सुमारास सावंतवाडी राजवाडयासमोर घडली. तत्पुर्वी तिने आपल्या प्रियकराला मारहाण करत त्याचा मोबाईल काढून घेतला. संबंधित युवक हा कारिवडेतील असून युवती कुडाळ तालुक्यातील आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
प्रियकर युवक हा सावंतवाडी शहरात कामाला आहे. संबंधित प्रयेसीच्या एका मैत्रिणीने तिला तुझा प्रियकर दुसऱ्या मुलीशी बोलतो असे सांगितले. यावरून तिने त्याला बोलावून घेत राजवाड्याच्या समोर मारहाण केली आणि मोबाईल काढून घेतला. याप्रकारामुळे त्या ठिकाणी गर्दी झाली. त्यावेळी युवकाने तेथून पलायन केले. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली.
संतप्त झालेल्या संबंधित तरुणीने सगळ्यांच्या समोर तलावात उडी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे जमलेल्या माजी नगरसेवक देवा टेमकर, शैलेश सरमळकर आदींनी तरुणीला आत्महत्येपासून परावृत्त केले. दरम्यान पोलिसांनी त्या युवतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तसेच तिच्या मैत्रिणीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्या दोघींची चौकशी सुरू आहे. मात्र संबंधित तरुण उशिरापर्यंत मिळून आला नाही. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.