कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावरील ओसरगाव येथे महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत मिळाल्यापासून अवघ्या ४८ तासांत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कणकवलीपोलिसांना यश आले.ओसरगाव येथे जळालेल्या स्थितीत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली असून, हा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे - वरचीवाडी येथील चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सुचिता सुभाष सोपटे (५९) हिचा असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी वितोरिन रुजाय फर्नांडिस (४५, रा. वेंगुर्ला, आरवली-टाक) याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली आहे. पैशाच्या हव्यासापोटी हा गुन्हा केल्याची कबुली आरोपीने दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.मुंबई - गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथे अर्धवट जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळला होता. त्या महिलेच्या मुलीने घटनास्थळी सापडलेले दागिने व अन्य साहित्य ओळखले असून, त्यानुसार मृतदेहाची ओळख पटल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
चार पथके तैनात, कोल्हापुरातही तपासया खुनाच्या तपासासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातच संशयित आरोपीने या महिलेचा खून केला व तिला ओसरगाव येथे आणून जाळले. तत्पूर्वी संशयित आरोपी हा कारने महिलेसह कोल्हापूर येथे गेला होता. कोल्हापूर येथे त्या महिलेने एका व्यक्तीकडून पाच हजार रुपये घेतले होते. तिथपर्यंत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पोहोचले. तेथे शोध घेण्यात आला. याठिकाणी एका सीसीटीव्हीमध्ये ती महिला व संशयित आरोपी कारसह पोलिसांच्या टप्प्यात आला. ही महिला कोल्हापूर येथे जाताना आपल्यासोबत आपल्या जावेचे काही दागिने घेऊन गेली होती. संशयित आरोपी कर्जबाजारी होता, असेदेखील समोर आले आहे.मोबाइल सीडीआर रिपोर्टनंतर होईल उलगडाजळालेली महिला ही घटनेच्या आदल्या दिवसापासून बेपत्ता होती. त्यामुळे निश्चितच ही घटना घडण्यासाठी आरोपी आणि त्या महिलेची गाठभेट कशी झाली? यामागे अन्य कोणी आहे का? तसेच अन्य कोण्या व्यक्तींचा सहभाग असेल तर ते केवळ जळीत मृत महिला आणि आरोपी या दोघांच्या मोबाइल सीडीआर रिपोर्टनुसार सिद्ध होऊ शकते. कुटुंबीयांकडे केलेल्या चौकशीतदेखील कोल्हापूरचा संदर्भ आला असून, मृत्यूपूर्वी फोन सुरू असताना तिने कुटुंबीयांना दिलेल्या माहितीतदेखील विसंगती आढळली होती. त्यामुळे तिला एवढ्या निर्दयीपणे का ठार मारण्यात आले, याचा तपासदेखील पोलिस करत आहेत.
पोलिसांच्या टीमचे यश सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, कणकवली पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह पोलिसांच्या टीमने याप्रकरणी कसून तपास करत हा गुन्हा उघडकीस आणला.
७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी !संशयित आरोपी वितोरिन फर्नांडिस याला कणकवली न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ७ मार्चपर्यंत म्हणजेच आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे ॲड. आशिष उल्हाळकर यांनी बाजू मांडली. तर संशयित आरोपीतर्फे ॲड. अक्षय चिंदरकर यांनी युक्तिवाद केला.