Sindhudurg: ‘गुलदार’ युद्धनौकेला वाऱ्यावर सोडले का?, गाजावाजात सुरू झालेला प्रकल्प अद्याप अपूर्णच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 19:24 IST2026-03-16T19:21:47+5:302026-03-16T19:24:37+5:30

युद्धनौका बंदरात उभी असून समुद्रतळाशी स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

An ambitious project to build an artificial reef and underwater museum by installing the Guldar warship on the seabed has been stalled | Sindhudurg: ‘गुलदार’ युद्धनौकेला वाऱ्यावर सोडले का?, गाजावाजात सुरू झालेला प्रकल्प अद्याप अपूर्णच

Sindhudurg: ‘गुलदार’ युद्धनौकेला वाऱ्यावर सोडले का?, गाजावाजात सुरू झालेला प्रकल्प अद्याप अपूर्णच

संदीप बोडवे

मालवण : सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाला नवी ओळख देण्याच्या उद्देशाने निवृत्त युद्धनौका समुद्रतळाशी स्थापित करून आर्टिफिशल रीफ आणि अंडरवॉटर म्युझियम उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने जाहीर केला होता. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग ठरणार असल्याने पर्यटन क्षेत्रात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आज परिस्थिती अशी आहे की, मोठ्या गाजावाजात सुरू झालेला हा प्रकल्प वर्ष उलटूनही पूर्णत्वाला गेलेला नाही. त्यामुळे ‘गुलदारला वाऱ्यावर सोडले का?’ असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे.

निवृत्त झालेली ही युद्धनौका पर्यटनासाठी वापरण्याच्या उद्देशाने येथे आणून ठेवण्यात आली. पुढे ती समुद्रतळाशी बुडवून त्या परिसरात कृत्रिम प्रवाळभित्ती तयार करणे, स्कुबा डायव्हिंगला चालना देणे आणि अंडरवॉटर संग्रहालय उभारणे असा या प्रकल्पाचा मुख्य हेतू होता. यामुळे सागरी जैवविविधतेला चालना मिळेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाचे नवे आकर्षण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.

या प्रकल्पासाठी शासनाने मोठ्या निधीची तरतूद केली. तांत्रिक तपासण्या, पर्यावरणीय परवानग्या आणि सुरक्षेच्या प्रक्रियेनंतर जहाज समुद्रतळाशी स्थापण्याचा आराखडा तयार करण्यात आला. इतकेच नव्हे तर प्रकल्पाचा शुभारंभही दृश्यप्रणालीद्वारे जून महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आला. मात्र, उद्घाटनानंतर प्रत्यक्ष कामाची गती मंदावल्याचे दिसून येते. आजही ही युद्धनौका बंदरात उभी असून समुद्रतळाशी स्थापनेची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

नौदलाकडून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला या युद्धनौकेचा ताबा मिळून आता वर्ष पूर्ण होत आले आहे. प्रकल्पासाठी आवश्यक सर्व तांत्रिक परवाने आणि पर्यावरणास घातक घटक हटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, १६ एप्रिल २०२५ रोजी माजगाव शिपबिल्डर्सला कार्यादेश देऊनही ‘स्कटलिंग’ प्रक्रिया झालेली नाही. पावसाळा जवळ येत असल्याने त्यापूर्वी ही कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे.

प्रकल्प प्रत्यक्षात अद्यापही अपूर्ण

विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी अनेक वेळा नवीन डेडलाइन जाहीर करण्यात आल्या. कधी एप्रिलपर्यंत काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले, तर कधी दिवाळीपूर्वी पर्यटनासाठी खुले करण्याची घोषणा करण्यात आली; परंतु प्रत्यक्षात प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही. परिणामी, पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.

कोकण किनारपट्टीवर अशा उपक्रमाची मोठी क्षमता

गुलदार प्रकल्प हा केवळ पर्यटनाचा विषय नाही. समुद्रतळाशी जहाज बुडविल्यानंतर त्याभोवती तयार होणारी कृत्रिम प्रवाळभित्ती सागरी जिवांसाठी नवीन अधिवास निर्माण करू शकते.
जगातील अनेक देशांनी अशा प्रकल्पांमधून पर्यटनासोबत पर्यावरण संवर्धनही साधले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर अशा उपक्रमाची मोठी क्षमता आहे.

प्रकल्प कागदावरच राहण्याची भीती

आजची परिस्थिती पाहता प्रश्न उपस्थित होतो.  इतक्या महत्त्वाच्या प्रकल्पाचे पुढे काय? प्रशासनाने नेमका कोणता अडथळा आहे हे स्पष्ट केले पाहिजे. प्रकल्पाचे अंतिम वेळापत्रक जाहीर करून कामाला गती देणे अत्यावश्यक आहे, अन्यथा मोठ्या अपेक्षांनी उभारलेला हा प्रकल्प कागदावरच राहण्याची भीती निर्माण झाली आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी गुलदार प्रकल्प एक ऐतिहासिक पाऊल ठरू शकतो. मात्र, त्यासाठी शासन आणि संबंधित यंत्रणांनी ठोस निर्णय घेऊन विलंबाला पूर्णविराम देणे आवश्यक आहे.

Web Title : सिंधुदुर्ग में 'गुलदार' युद्धपोत परियोजना रुकी, समापन पर सवाल।

Web Summary : सिंधुदुर्ग की महत्वाकांक्षी पानी के नीचे संग्रहालय परियोजना, जिसमें 'गुलदार' युद्धपोत शामिल है, में देरी हो रही है। शुरुआती धूमधाम और धन के बावजूद, परियोजना अधूरी है, जिससे इसके भविष्य और पर्यटन पर प्रभाव के बारे में चिंताएं बढ़ रही हैं।

Web Title : Sindhudurg's 'Guldar' warship project stalled, raises questions about its completion.

Web Summary : Sindhudurg's ambitious underwater museum project, featuring the 'Guldar' warship, faces delays. Despite initial fanfare and funding, the project remains incomplete, raising concerns about its future and impact on tourism.