Sindhudurg: पार्टीसाठी गेलेल्या प्रौढ व्यक्तीचा जानवली तलावाजवळील डोहाच्या पाण्यात बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:42 IST2025-06-10T12:41:35+5:302025-06-10T12:42:37+5:30

त्यांच्यासोबत गेलेल्या चौघांजवळ चौकशी केली असता त्यांनी संदिग्ध माहिती दिली

An adult who had gone to a party drowned in a pond near Janavali Lake | Sindhudurg: पार्टीसाठी गेलेल्या प्रौढ व्यक्तीचा जानवली तलावाजवळील डोहाच्या पाण्यात बुडून मृत्यू 

Sindhudurg: पार्टीसाठी गेलेल्या प्रौढ व्यक्तीचा जानवली तलावाजवळील डोहाच्या पाण्यात बुडून मृत्यू 

कणकवली : कणकवली शहरापासून जवळच असलेल्या जानवली, बौद्धवाडी नंबर १ येथील रहिवासी किसन भिकाजी पवार (५२) यांचा जानवली, सखलवाडी पाझर तलावानजीक खोल पाण्याने भरलेल्या डोहात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे.

किसन पवार यांच्यासह अन्य चौघेजण रविवारी पार्टीसाठी जानवली, सखलवाडी पाझर तलाव परिसरात गेले होते. यावेळी किसन पवार हे धरण क्षेत्रात असलेल्या खोल पाण्याने भरलेल्या डोहात उतरले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

रविवारी रात्री उशिरापर्यंत किसन पवार घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. तसेच त्यांच्यासोबत गेलेल्या चौघांजवळ चौकशी केली असता त्यांनी संदिग्ध माहिती दिली. मात्र, पवार कुटुंबीयांनी याबाबत अधिकची माहिती घेत, तुम्ही सर्व कुठे गेला होता? कुठे पार्टी केली? असे प्रश्न त्या चौघांना विचारले. तसेच जानवली तलाव क्षेत्रातील मुख्य गेट पासून शोधाशोध सुरू केली. त्या चौघांना घेऊन ज्या ठिकाणी त्यांनी एकत्र जेवण केले तिथपर्यंत ते पोहोचले. यावेळी किसन यांचा मृतदेह तेथे डोहातील पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले. 

त्यामुळे पोलिसाना या घटनेबाबत पवार यांचे नातेवाईक महेश महादेव कदम यांनी कळविले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारुती जगताप, पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, हवालदार गुणीजन, पोलिस पाटील मोहन सावंत, दामोदर सावंत, संदीप सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.तसेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली ? याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: An adult who had gone to a party drowned in a pond near Janavali Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.