कोकण किनारपट्टीला 'क्यार'नंतर 'महा' चक्रीवादळाचा तडाखा, पर्यटनावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 03:06 PM2019-11-01T15:06:39+5:302019-11-01T15:15:19+5:30

क्यार चक्रीवादळानंतर पुन्हा नव्याने निर्माण झालेल्या 'महा' चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीवर दिसून येत आहे.

after Kyar Cyclone Maha Cyclone hits Malvan tourism | कोकण किनारपट्टीला 'क्यार'नंतर 'महा' चक्रीवादळाचा तडाखा, पर्यटनावर परिणाम

कोकण किनारपट्टीला 'क्यार'नंतर 'महा' चक्रीवादळाचा तडाखा, पर्यटनावर परिणाम

googlenewsNext
ठळक मुद्देक्यार चक्रीवादळानंतर पुन्हा नव्याने निर्माण झालेल्या 'महा' चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीवर दिसून येत आहे. खराब वातावरणामुळे प्रवासी वाहतूक बंद केल्याने जेटीवर किल्ला दर्शनासाठी शेकडो पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. अरबी समुद्रातंर्गत बदलांचा मोठा फटका यावर्षीच्या पर्यटन हंगामास बसला आहे.

मालवण : क्यार चक्रीवादळानंतर पुन्हा नव्याने निर्माण झालेल्या 'महा' चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीवर दिसून येत आहे. शुक्रवारी (1 नोव्हेंबर) सकाळपासून समुद्री वातावरणात बदल झाला असून समुद्री लाटांचा जोर वाढला आहे. याचा फटका किल्ला प्रवासी होडी वाहतूकीस बसला आहे. खराब वातावरणामुळे प्रवासी वाहतूक बंद केल्याने जेटीवर किल्ला दर्शनासाठी शेकडो पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. 

अरबी समुद्रातंर्गत बदलांचा मोठा फटका यावर्षीच्या पर्यटन हंगामास बसला आहे. क्यार चक्रीवादळानंतर महा चक्रीवादळ सक्रीय झाल्याने त्याचा परिणाम किनारपट्टी भागात जाणवू लागला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच समुद्री वातावरणात बदल झाल्याचे दिसून आले. यात लाटांचा वेग वाढला असून किनार्‍यावर लाटांचा तडाखा बसत आहे. समुद्र खवळल्याने किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. दिवाळी सुटीच्या काळात काही प्रमाणात येथे पर्यटक दाखल झाले आहेत. मात्र खराब वातावरणाचा फटका पर्यटनास बसला असून आज किल्ला दर्शनासाठी जेटीवर दाखल झालेल्या शेकडो पर्यटकांना जेटीवरूनच किल्ला दर्शन घ्यावे लागत आहे. दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने मालवणात पर्यटकांचा ओघ असून गुरुवारी दोन हजार पर्यटकांनी किल्ले दर्शन केले. गुरुवारी वातावरण निवळल्याने होडी सेवा सुरळीत ठेवण्यात आली होती.

 ‘क्यार’ वादळाचा याआधी काही दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. किनारपट्टी भागात दर्याला उधाण आल्याने किनारपट्टीलगतच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं. तसेच पावसामुळे भातशेतीचे मोठं नुकसान झालं आहे. तर किनारपट्टी भागात समुद्राच्या उधाणाचे पाणी लगतच्या वस्तीत गेल्याने त्याठिकाणचे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तळकोकणात दोडामार्ग, वेंगुर्ले, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, कणकवलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस  पडला. किनारपट्टीच्या भागात समुद्राच्या उधाणाचा फटका आचरा पिरावाडी, जामडूल बेटाला देखील बसला. खाडी किनारपट्टी लगतच्या घरांमध्ये शिरल्याने घरातील अन्न धान्यासहीत इलेक्ट्रॉनिक वस्तू भिजून गेल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीतही पाणी शिरल्याने पिण्याचे पाणी देखील दूषित झालंय, तर काही मच्छिमारांच्या जाळीचेही नुकसान झाले. 

मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन दिवाळी सणात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पसरली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शासनाने तातडीने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याची मागणी जिल्ह्यातील ग्रामस्थांतून होत आहे. सिंधुदुर्गातील प्रमुख पीक म्हणून भातशेती केली जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो एकर क्षेत्रावर ही भातशेती केली जाते. अनेक शेतकरी या भातशेतीवर अवलंबून आहेत. आता भातशेती जवळपास पूर्ण परिपक्व असून त्याची कापणी होणे गरजेचे असतानाच गेले काही दिवस मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात 10 टक्केही भातकापणी झालेली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Web Title: after Kyar Cyclone Maha Cyclone hits Malvan tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.