Sindhudurg: समुद्र खवळला, प्रशासन अलर्ट मोडवर; मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांना सतर्कतेच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:21 IST2025-10-29T15:19:57+5:302025-10-29T15:21:01+5:30
ऐन हंगामात आलेल्या पावसामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले

Sindhudurg: समुद्र खवळला, प्रशासन अलर्ट मोडवर; मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांना सतर्कतेच्या सूचना
मालवण : किनारपट्टीवर जोरदार वारे आणि खवळलेल्या समुद्रामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. मत्स्य आणि बंदर विभागाकडून मच्छिमार तसेच सागरी पर्यटन व्यावसायिकांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
खराब समुद्री हवामानामुळे सलग चौथ्या दिवशी सिंधुदुर्ग किल्ले प्रवासी होडी वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, वादळी हवामानाचा मासेमारी आणि पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. ऐन हंगामात आलेल्या पावसामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
किनारपट्टीवर शुकशुकाट
दिवाळीच्या हंगामात आपल्या सुट्ट्या व्यतीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक किनारपट्टीवर आपली हजेरी लावतात. मात्र, वादळी पाऊस आणि खराब हवामानामुळे स्कुबा डायविंग, पॅरासेलिंग आदी जलक्रीडा प्रकार बंद ठेवावे लागल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. मासेमारी नौकाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्यामुळे मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. पर्यटक आणि मच्छीमारांमुळमुळे एरव्ही गजबजलेल्या किनारपट्टीवर शुकशुकाट दिसून आला.
बंदर विभाग सतर्क
बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंदर विभागाची टीम किनारपट्टीवर लक्ष ठेवून आहे. ज्या ज्या ठिकाणी सागरी जलक्रीडा प्रकार चालतात अशा तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला, मालवण या किनारपट्टीवर बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गस्त चालू केली आहे. हवामान शांत होईपर्यंत समुद्रातील सर्वच जल क्रीडा प्रकार बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बंदर जेटी आणि अन्य सागरी जल पर्यटन चालत असलेल्या किनारपट्टीवर लक्ष ठेवून आहोत. बंदरात १ नंबरचा बावटा लावण्यात आल्या असल्याचे बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी सांगितले.
मत्स्य विभागाकडून खबरदारीचा इशारा
प्रादेशिक हवामान विभागाकडून प्राप्त हवामान संदेशानुसार हवामान विभागाने राज्याच्या किनाऱ्यालगत असलेल्या मच्छीमारांना सतर्कतेचा तसेच समुद्रात न जाण्याबाबतचा इशारा दिलेला आहे. यामुळे अधिनिस्त नौका मालक व मच्छीमार यांना खबरदारीचा सूचना देण्यात आली आहे. २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत ४० ते ५० किमी प्रति तास वेगाने वारे वाहणार असून, त्याचा वेग ६० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
पर्यटक वळले राजकोट किल्यावर......
सिंधुदुर्ग किल्ला, आणि सागरी जलक्रीडा पर्यटन बंद असल्यामुळे पर्यटकांनी आपला मोर्चा राजकोट किल्ल्याकडे वळविला. मंगळवारी सकाळी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. या ठिकाणी खडकाळ किनाऱ्यावर समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांचाही पर्यटकांनी आनंद लुटला.
यांत्रिक, यंत्रचलित नौकांनी, तसेच बिगर यांत्रिकी नौकांनी देखील या कालावधीत खाडी क्षेत्रात अथवा समुद्रात मासेमारीस जाऊ नये. वादळीवारे सह पाऊसाचे हवामान योग्य होईपर्यंत जिल्ह्यातील कोणत्याही नौका वादळी हवामानाच्या या कालावधीत समुद्रात जाणार नाहीत, याबाबत खबरदारी घेण्यात यावी. नौका, जाळी, इंजिन आदी मासेमारी साधने सुरक्षित ठिकाणी ठेवावी. योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. - सागर कुवेसकर, मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त