दोडामार्ग : उद्योगांच्या नावाने ठणठणाट असलेली आडाळी एमआयडीसी आता खनिजयुक्त मातीच्या तस्करीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या मातीला सोन्याचा भाव मिळत असल्याने दिवसाढवळ्या उत्खनन करून रात्रीच्यावेळी तिची वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे हे सगळे डोळ्यांसमोर घडत असताना महसूल यंत्रणा आणि औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिकेत वावरत असल्याने सरकारी मालमत्तेच्या संपत्तीची खनिज तस्करांकडून लाखो रुपयांची लूट सुरूच आहे.उद्योगधंदे यावेत आणि बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी आडाळी एमआयडीसी तत्कालीन उद्योगमंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी मंजूर केली. त्यानंतर त्यात भौतिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या पण आजतागायत एकही उद्योग एमआयडीसीत आलेला नाही.आमदार दीपक केसरकर यांनी उद्योजकांना आणून एमआयडीसीची पाहणी केली. त्यांच्यासोबत आलेल्या उद्योजकांनीही सकारात्मकता दर्शविली पण त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झाले नाही. त्यानंतर स्थानिक कृती समितीने भूखंड वाटपाबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप करीत सरकारला जाग आणण्यासाठी लॉगमार्च काढला. त्यामुळे आडाळी एमआयडीसी चांगलीच चर्चेत आली होती.त्यांनतर भूखंड वाटप झाले त्याची निविदाही निघाली. परंतु, आजतागायत एकही कारखाना आलेला नाही. उलट या एमआयडीसीत सध्या नको ते उद्योग सुरू झालेले आहेत. परिणामी कारखान्यांच्या येण्यापेक्षा या सुरू असलेल्या बेकायदेशीर नसत्या उद्योगांमुळेच सध्या एमआयडीसी चर्चिली जात आहे.
दिवसाही उत्खनन सुरूच
- गेल्या काही दिवसांपासून आडाळी एमआयडीसी क्षेत्रात विनापरवाना खनिजयुक्त मातीचे उत्खनन खनिज तस्करांकडून सुरू आहे.
- या उत्खननाला ना एमआयडीसी प्राधिकरणाची परवानगी ना महसूल खात्याची ! तरीही बिनदिक्कतपणे उत्खनन सुरू आहे.
- सुरुवातीला रात्रीच्यावेळी सुरू असलेले हे उत्खनन आता दिवसाही केले जात आहे. मात्र, असे असले तरी महसूल, खनिकर्म विभाग डोळेझाक करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
मातीच्या तस्करीतून एकाला मारहाण ?याच खनिजयुक्त मातीच्या तस्करीतून एका युवकाला काही दिवसांपूर्वी मारहाण झाल्याची चर्चा आहे. रात्रीच्यावेळी उत्खनन केलेली माती उचलण्यावरून झालेल्या वादातून ही मारहाण झाल्याचे बोलले जात आहे