चिमुकल्या 'ध्रुव'च्या अपघाती मृत्यूने माणगाव हळहळले; उपचारादरम्यान निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 22:59 IST2023-11-17T22:59:22+5:302023-11-17T22:59:51+5:30
झाराप पत्रादेवी मार्गावर झाला होता अपघात, गोवा येथे सुरू होते उपचार

चिमुकल्या 'ध्रुव'च्या अपघाती मृत्यूने माणगाव हळहळले; उपचारादरम्यान निधन
सावंतवाडी : मळगाव येथील आपल्या माहेरी माणगाव येथून दुचाकीने येत असताना पाठीमागून वेगाने येणाऱ्या कारची जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात माणगाव येथील मुग्धा पावसकर या जखमी झाल्या होत्या. तर या अपघातात गंभीर जखमी झालेला त्यांचा मुलगा ध्रुव गौरव पावसकर (५ ) याचे गुरुवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान गोवा येथे निधन झाले. हा अपघात मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरील स्वामी धाबा सर्कलवर गुरुवारी सायंकाळी घडला होता.
माणगाव येथील गौरव पावसकर हे एम्. आर. म्हणून काम करतात. माणगाव दत्तमंदिर स्टॉप जवळ ते राहतात. त्यांची पत्नी मुग्धा पावसकर पूर्वाश्रमीच्या मुग्धा नाटेकर या गुरुवारी सायंकाळी उशिरा मळगाव रस्तावाडा येथील आपल्या माहेरी येत होत्या. त्यांचे आईवडील पुणे येथे मुलासोबत राहतात. दिवाळी निमित्त ते मळगाव येथील घरी आले होते. तसेच मोठी बहीणही आली होती. या सर्वांना भेटण्यासाठी त्या आपल्या ज्युपिटर दुचाकीने येत होत्या.
त्या मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरील सर्कल वरून मळगावच्या दिशेने वळत असताना पाठीमागून वेगाने आलेल्या कारची जोरदार धडक त्यांच्या दुचाकीला बसली.
या अपघातात मुग्धा हिच्या कंबर व पायाला मोठी दुखापत झाली होती. तर मुलगा ध्रुव हा रस्त्यावर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. अपघातानंतर दोघांनाही प्रथम सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ध्रुव गंभीर जखमी असल्याने त्याला गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारा दरम्यान ध्रुव याचे रात्री दुर्दैवी निधन झाले.या घटनेने माणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.