Sindhudurg: भिरंवडे येथील तरुणाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू, मुंबईत होता नोकरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:31 IST2025-08-21T15:30:38+5:302025-08-21T15:31:09+5:30
गोवा, बांबुळी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

Sindhudurg: भिरंवडे येथील तरुणाचा डेंग्यूच्या आजाराने मृत्यू, मुंबईत होता नोकरीला
कणकवली : भिरंवडे, कदमवाडी येथील गणेश सुरेश कदम (वय २५) या तरुणाचा गोवा, बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्याने बीएससी नर्सिंग पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो मुंबईतील खासगी रुग्णालयात नोकरीला होता. ताप येत असल्यामुळे व तपासणी अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आल्याने तो उपचारासाठी गावी आला होता. खासगी रुग्णालयातील उपचारानंतर त्याला अधिक उपचारासाठी गोवा, बांबुळी रुग्णालयात मंगळवारी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
भिरंवडे प्राथमिक शाळा व कनेडी विद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने बीएससी नर्सिंग पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात गणेश कदम हा रुग्णसेवा देत होता. काही दिवसांपूर्वी त्याला ताप येऊ लागला. त्याच्या तपासणीमध्ये तो डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते.
तो एकटाच मुंबईला राहत होता. तर आई, वडील व कुटुंबिय गावी राहत असल्याने रविवारी सकाळी तो भिरंवडे येथे आला होता. त्यानंतर कनेडी व कणकवली येथे खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी त्याला अधिक त्रास होऊ लागल्याने अधिक उपचारासाठी कुडाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी त्याला गोवा, इबांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आरोग्य कर्मचाऱ्यांकडून भिरवंडे, कदमवाडी येथे सर्वेक्षण
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्याचे निधन झाले. त्याच्यावर भिरंवडे येथील स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, भाऊ, काका, काकी, बहिणी असा परिवार आहे. गणेश याचे तपासणी अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांकडून भिरंवडे, कदमवाडी येथे सर्वेक्षण करण्यात आले.