कणकवलीत यंदाही भरणार दिवाळी विशेष बाजार; स्टॉलवर टेबल, खुर्ची, विजेची मोफत व्यवस्था
By सुधीर राणे | Updated: October 8, 2022 15:35 IST2022-10-08T15:23:38+5:302022-10-08T15:35:47+5:30
२३ ऑक्टोबर पर्यंत हा बाजार सुरू राहणार

कणकवलीत यंदाही भरणार दिवाळी विशेष बाजार; स्टॉलवर टेबल, खुर्ची, विजेची मोफत व्यवस्था
कणकवली : स्थानिक व्यावसायिक तसेच बचतगटातील महिलांना आपली उत्पादने विकण्यासाठी हक्काची जागा व बाजारपेठ मिळावी यासाठी गतवर्षीप्रमाणे यावर्षीही कणकवली येथे विशेष दिवाळी बाजार भरवण्यात येणार आहे. आमदार नितेश राणेंच्या हस्ते १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता या दिवाळी बाजाराचे उद्घाटन होणार आहे. २३ ऑक्टोबर पर्यंत हा बाजार सुरू राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक बंडू गांगण आदी उपस्थित होते.
नलावडे म्हणाले, हा दिवाळी बाजार समीर नलावडे मित्रमंडळ आणि भाजपाचे सर्व नगरसेवक यांच्या संयोजनातून भरवला जाणार आहे. गतवर्षी दिवाळी बाजारात मोठी उलाढाल झाली होती. त्यामुळे बचतगटातील महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला होता. त्यामुळे यावर्षीही पुन्हा कणकवली बसस्थानकाच्या लगतच्या पेट्रोल पंपासमोर महामार्ग उड्डाणपुलाखाली दिवाळी बाजार भरवला जाणार आहे.
एकूण ३५ विविध प्रकारचे स्टॉल लावले जाणार आहेत. स्टॉल मध्ये टेबल, खुर्ची आणि विजेची व्यवस्था मोफत केली जाणार आहे. बाजारात प्लास्टिक आकाश कंदील विकता येणार नाहीत. या दिवाळी बाजारात सहभागी होण्यासाठी स्टॉल बुकिंग आवश्यक असून माजी नगराध्यक्षा मेघा गांगण यांच्याशी संबंधितांनी संपर्क साधावा असे आवाहनही समीर नलावडे यांनी यावेळी केले.