Sindhudurg: पतीशी किरकोळ वाद, दोन मुलांसह आईने खाडीच्या पाण्यात उडी घेत संपवले जीवन
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: April 17, 2025 19:03 IST2025-04-17T19:02:20+5:302025-04-17T19:03:05+5:30
देवगड : तालुक्यातील तिर्लोट-आंबेरी पुलावरून दोन मुलांसह आईने खाडीच्या पाण्यात उडी घेत आत्महत्या केली. श्रीशा सुरज भाबल (वय-२४), श्रेयश ...

Sindhudurg: पतीशी किरकोळ वाद, दोन मुलांसह आईने खाडीच्या पाण्यात उडी घेत संपवले जीवन
देवगड : तालुक्यातील तिर्लोट-आंबेरी पुलावरून दोन मुलांसह आईने खाडीच्या पाण्यात उडी घेत आत्महत्या केली. श्रीशा सुरज भाबल (वय-२४), श्रेयश (५) व दुर्वेश (४) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना आज, गुरुवारी (दि.१७) सकाळी उघडकीस आली. पतीशी झालेल्या किरकोळ वादातून श्रीशा हिने मुलांसमवेत आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून या घटनेने देवगड तालुका हादरला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिर्लोट- आंबेरी येथील सुरज सुहास भाबल यांच्याशी श्रीशा हिचा २२ जून २०१८ रोजी विवाह झाला. श्रीशाचे माहेर कर्नाटक रायचूर येथील असून ती आई वडिलांसमवेत कल्याण येथे राहत होती. तिचे पती सुरज भाबल हे नोकरीनिमित्त मुंबई दादर येथे राहत असून रेल्वेमध्ये नोकरीस आहेत. त्यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली होती.
श्रीशा ही तिचे मुलगे श्रेयश व दुर्वेश यांच्यासमवेत सासरी तिर्लोट आंबेरी येथे राहत होती. पतीशी फोनवरून मुंबईला घेवून जाण्याबाबत बोलत होती. परंतू पती सुरज याने राहण्याची व्यवस्था नसल्याने तीला मुंबईला घेवून जाण्याबाबत नकार दिला. यावेळी मगंळवारी (दि.१५) रागात श्रीशा दोन्ही मुलांना घेवून घरातून निघून गेली. तीचा आजूबाजूला शोध घेवूनही ती मिळाली नाही. १६ एप्रिल रोजी सायंकाळी आंबेरी जेटीजवळ श्रीशाचा मृतदेह आढळून आला. तसेच तेथीलच पिराचे पोय याठिकाणी श्रेयशचा मृतदेह सापडला. तर दुर्वेशचा मृतदेह आज, दुपारी आंबेरी खाडीपात्रातच कातळी किनारी सापडला.
घटनेची माहिती श्रीशाचे सासरे सुहास भाबल यांनी विजयदुर्ग पोलिस स्थानकात दिली. देवगड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेची माहिती समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी घनःश्याम आढाव यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. विजयदुर्ग पोलिस स्थानकात घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.