गुंगीचे औषध देऊन एका जोडप्याने रिक्षा व्यावसायिकाला लुटले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ
By सुधीर राणे | Updated: September 28, 2022 13:50 IST2022-09-28T13:50:05+5:302022-09-28T13:50:31+5:30
कणकवली : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे रिक्षा भाड्याने करून घेऊन जात तळेरे येथील चालकाला गुंगीचे औषध देऊन एका जोडप्याने लुटल्याची ...

गुंगीचे औषध देऊन एका जोडप्याने रिक्षा व्यावसायिकाला लुटले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ
कणकवली : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे रिक्षा भाड्याने करून घेऊन जात तळेरे येथील चालकाला गुंगीचे औषध देऊन एका जोडप्याने लुटल्याची धक्कादायक घटना घडली. सोन्याचे दागिने व रोख रक्कमेसह तब्बल ८४ हजार ५०० रुपये या जोडप्याने लंपास केले. याप्रकरणी कणकवली पोलिसात संशयित जोडप्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
रिक्षा चालक संजय तुकाराम तळेकर (वय-६५ तळेरे – गावठण) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २६ सप्टेंबर रोजी एक जोडपे तळेरे बस स्टँड जवळ तळेकर यांच्या रिक्षेकडे जात तळेबाजार येथे जायचे असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत सुमारे दोन ते अडीच वर्षाचे एक लहान मूल देखील असल्याचेही तक्रारदार यांनी म्हटले आहे. या जोडप्याने तळेबाजार येथील देवी मंदिराकडे जायचे असल्याचे सांगितले. त्यावर तळेकर यांनी १ हजार रुपये भाडे होईल असे सांगितले. ते भाडे मान्य झाल्याने त्या जोडप्याला मुलासह तळेकर हे देवीच्या मंदिराजवळ घेऊन गेले.
तेथून कुणकेश्वर येथे जायचे आहे असे सांगितले. यावेळी तळेकर यांनी रिक्षा देवगड रोडच्या दिशेने घेतली. याच दरम्यान त्या जोडप्याने आम्ही गणपतीपुळे येथील देवदर्शनाचा पेढा आणला आहे तो घ्या असे सांगत चालक तळेकर यांना पेढा दिला. व त्यानंतर देवगड जामसडे येथे रिक्षा आली असता रिक्षा एका टपरी जवळ थांबवण्यास सांगितली. रिक्षा थांबवल्यावर त्या जोडप्याने तळेकर यांना एक थंड पेयाची बाटली आणून दिली. यानंतर आम्हाला कुणकेश्वर येथे जायचे नाही असे सांगत पुन्हा तळेरे स्टॅन्ड येथे सोडा असे सांगितले. त्यानंतर पुढे काय घडले हे मला आठवत नसल्याचे तळेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान तळेकर यांना तेथील रिक्षा चालकांनी व नागरिकांनी कणकवलीत एका खासगी रुग्णालयात उपचाराकरीता दाखल केले. शुद्धीवर येताच त्यांना आपण लुटलो गेल्याचे लक्षात आले. सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल त्या जोडप्याने लंपास केल्याची तक्रार तळेकर यांनी दिली आहे. त्यानुसार संशयित जोडप्याच्या विरोधात भा द वि कलम ३२८, ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.