कोकण रेल्वेमार्गावरील कोकिसरेतील भुयारी मार्गासाठी आज रात्री ४ तास ‘मेगा ब्लॉक’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 17:20 IST2025-04-17T17:20:18+5:302025-04-17T17:20:40+5:30
यंत्रणा सज्ज : २ मेपूर्वी भुयाराचे काम पूर्ण होणार; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बनवणार जोडरस्ते वैभववाडी : कोकिसरे येथील रेल्वे ...

कोकण रेल्वेमार्गावरील कोकिसरेतील भुयारी मार्गासाठी आज रात्री ४ तास ‘मेगा ब्लॉक’
यंत्रणा सज्ज : २ मेपूर्वी भुयाराचे काम पूर्ण होणार; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बनवणार जोडरस्ते
वैभववाडी : कोकिसरे येथील रेल्वे फाटकाच्या पर्यायी भुयारी मार्गाच्या कामाने गती घेतली आहे. या भुयारी मार्गाच्या ठिकाणी तात्पुरता ट्रॅक बनविण्यासाठी गुरुवारी (दि. १७) रेल्वेमार्गावर चार तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यानंतर भुयारी मार्गाचा तयार ढाचा आणखी दोनदा मेगा ब्लॉक घेतला जाईल. ही संपूर्ण प्रकिया २ मेपूर्वी पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.
कोकण रेल्वेमार्गावरील कोकिसरे रेल्वे फाटकाच्या त्रासातून २७ वर्षांनंतर सुटका होणार आहे. या रेल्वे फाटकालगतच भुयारी मार्ग तयार करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. रेल्वे ट्रॅकच्या खाली बसविण्यासाठी आरसीसी ढाचा तयार करण्यात आला आहे. साडेआठ मीटर रुंद, साडेपाच मीटर उंच आणि ५३ मीटर लांबीच्या दोन मार्गिकांचा ढाचा तयार झाला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाकडून हा ढाचा रेल्वे ट्रॅकखाली सरकविणे आणि त्या कालावधीत पर्यायी ट्रॅक तयार करणे अशा कामांचे नियोजन सध्या सुरू आहे. या कामासाठी आवश्यक यंत्रसामग्री दाखल झाली आहे.
पहिल्यांदा पर्यायी ट्रॅक उभा करणे, त्यानंतर त्याखाली खोदाई करून आरसीसी ढाचा ट्रॅक खाली बसविणे आणि ट्रॅक पूर्ववत करणे अशा कामांसाठी १७ एप्रिल ते २ मे या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी रात्री ११.३० ते पहाटे ३.३० वा या वेळेत तीनदा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.
दरम्यान, कोकण रेल्वेचे उपकार्यकारी अभियंता राजीव पटगार यांनी कामाची पाहणी केली. त्यांच्यासोबत इतर अधिकारी होते. दरम्यान, ही सर्व कामे २ मेपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या २७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण होणार आहे.
भुयारी मार्ग व जोड रस्त्यासाठी ६४ लाख
रेल्वे फाटकाला पर्यायी भुयारी मार्गासाठी १६ कोटी ७६ लाख ५२ हजार ६१८ रुपये निधी मंजूर आहेत. याशिवाय भुयारी मार्गाच्या जोडरस्ता आणि इतर कामासाठी असा एकूण ६४ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. २०२२ मध्ये या कामाला कार्यारंभ आदेश देण्यात आला. त्यावेळी कामाची मुदत १८ महिने होते. त्यानंतर त्यामध्ये वाढ करण्यात आलेली असून, मेमध्ये भुयारी मार्ग पूर्ण होणार आहे.