सिंधुदुर्गात २० मिनी बस दाखल होणार - मंत्री नितेश राणे; कणकवली बसस्थानकात अद्ययावत बसचे लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:31 IST2025-03-24T17:31:17+5:302025-03-24T17:31:57+5:30
कणकवली : सिंधुदुर्ग हा डोंगराळ जिल्हा आहे. या भागात एसटीच्या मिनी बसेसची सेवा सुरू करावी, अशी प्रवाशांची अनेक वर्षांची ...

सिंधुदुर्गात २० मिनी बस दाखल होणार - मंत्री नितेश राणे; कणकवली बसस्थानकात अद्ययावत बसचे लोकार्पण
कणकवली : सिंधुदुर्ग हा डोंगराळ जिल्हा आहे. या भागात एसटीच्या मिनी बसेसची सेवा सुरू करावी, अशी प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण होण्यासाठी परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मी पाठपुरावा केलेला आहे. त्यानुसार महिन्याभरात २० मिनी बसेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. तर सीएनजीवर चालणाऱ्या बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेसमुळे एसटीच्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व आरामदायी होणार आहे, असा विश्वास मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील कणकवली आगारात अद्ययावत बसेस दाखल झाल्या आहेत. या बससेवेचा शुभारंभ मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते रविवारी झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कणकवली आगार व्यवस्थापक अजय गायकवाड, स्थानक प्रमुख प्रदीप परब यांच्यासह एसटीचे कर्मचारी व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सीएनजीवर चालणाऱ्या एसटीच्या बसेस मिळण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील बसेस आलेल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यातील बसेस लवकरच येणार आहेत. या बसेसची देखभाल करण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची असली तरी त्या बसेस नादुरुस्ती होणार नाहीत, यासाठी प्रवाशांसह नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. एसटीच्या प्रवाशांसह प्रशासनाच्या ज्या-ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करण्याची जबाबदारी महायुती सरकारची असणार आहे.
सुरक्षिततेचे उपाय वाढवले जातील
एसटी प्रवासी सुरक्षिततेबाबत पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, पुण्यामध्ये ज्या प्रकारची घटना घडली तशी घटना सिंधुदुर्गात घडता कामा नये या दृष्टीने सुरक्षिततेचे उपाय वाढवले जातील. त्याचप्रमाणे कणकवली बस स्थानकात असलेल्या पोलिस कक्षात जिल्हा अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याशी बोलून पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येईल.
एसटीच्या महिला वाहक संगीता मोरे यांचा ट्रान्सपोर्ट असोसिएशनतर्फे दिल्लीत सन्मान करण्यात आला. याबद्दल कणकवली आगारातर्फे मंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
एसटीतून फेरफटका
कणकवली एसटी आगारात बसचे लोकार्पण झाल्यानंतर मंत्री नीतेश राणे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी बसस्थानक परिसरात एसटीतून फेरफटका मारला. तसेच प्रवाशांना चांगली सेवा देण्याचे आवाहन एसटीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले.