Sindhudurg: वेंगुर्ला एसटी वाहतूक नियंत्रक मारहाणप्रकरणी ११ एसटी कर्मचारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:57 IST2025-08-11T17:56:08+5:302025-08-11T17:57:51+5:30
समिती गठीत करून चौकशी करणार

संग्रहित छाया
वेंगुर्ला : वेंगुर्ला एसटी वाहतूक नियंत्रक मारहाणप्रकरणी ११ एसटी कर्मचारी यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई एसटीच्या कणकवली विभागीय कार्यालयाकडून करण्यात आली आहे. शिस्तभंग व गैरवर्तवणुकीचा या कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यात वेंगुर्ला आगारातील १० तर कुडाळ आगारातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
याबाबत वेंगुर्ला आगार व्यवस्थापक राहुल कुंभार यांनी सिंधुदुर्ग विभागीय वाहतूक अधीक्षकांना दिलेल्या अहवालानुसार, वेंगुर्ला आगारामध्ये ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. वाहन परीक्षक म्हणून कामगिरीवर असलेल्या चालकात व तीच एसटी बस दुसऱ्या फेरीसाठी घेणाऱ्या चालकात एसटी देवाणघेवाणवरून वाद झाले.
यात अन्य काही कर्मचारी व त्या वाहन परीक्षक यांच्यात शिवीगाळ झाली. यानंतर आगारातील सुरक्षा रक्षक गेटवर सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या कर्मचाऱ्यांना गोळा करण्यात आले. वाहन परीक्षक यांना गेटच्या बाहेर घेतल्याशिवाय कोणीही बस मार्गस्थ करू नये, असे संघटनेमार्फत ठरवण्यात आले. यानंतर ६ ऑगस्ट रोजी दुपारी १:४५ ते रात्रीपर्यंत नियोजित फेऱ्या न गेल्याने व उशिरा धावल्याने प्रवाशांची गैरसोय होऊन परिवहन मंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचे आगार व्यवस्थापक यांनी दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
यानंतर हे प्रकरण वाढून वाहतूक नियंत्रक यांना काही कर्मचारी यांच्याकडून मारहाण करण्यात आली. यानंतर हे प्रकरण वेंगुर्ला पोलिस ठाण्यात गेले. यावेळी वाहतूक नियंत्रक यांनी तक्रार न दिल्याने हे प्रकरण मिटवण्यात आले. मात्र, आगार व्यवस्थापकांनी विभागीय वाहतूक अधीक्षकांना दिलेल्या अहवालानुसार वेंगुर्ला आगार वाहतूक नियंत्रक, सहायक वाहतूक निरीक्षक व वाहन परीक्षक यांना मारहाण, शिवीगाळ केल्याप्रकरणी वेंगुर्ला आगारातील १० व कुडाळ आगारातील १ अशा एकूण ११ कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटिसा विभागीय वाहतूक अधीक्षक यांच्यामार्फत बजावण्यात आल्या आहेत.
समिती गठीत करून चौकशी करणार
याप्रकरणी एक समिती गठीत करून चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्राप्त माहिती व अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.