झकास महामार्ग वृक्षांविना भकास !.पर्यावरणप्रेमींमधून नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 17:02 IST2021-01-06T16:55:09+5:302021-01-06T17:02:11+5:30
highway Satara area pwd -पुणे-बंगलोर आशियाई महामार्गाचे विस्तारीकरण अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यातच शासकीय नियम धाब्यावर बसवून संबंधित यंत्रणेने पर्यावरणाला हानी पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे.

झकास महामार्ग वृक्षांविना भकास !.पर्यावरणप्रेमींमधून नाराजी
खंडाळा : पुणे-बंगलोर आशियाई महामार्गाचे विस्तारीकरण अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यातच शासकीय नियम धाब्यावर बसवून संबंधित यंत्रणेने पर्यावरणाला हानी पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे.
ठिकठिकाणच्या वृक्षांवर कुऱ्हाड फिरविल्याने महामार्गाचे रूप भकास झाले आहे. शासन नियमांना बगल देत मनमानी करणाऱ्या या यंत्रणेवर प्रदूषण मंडळाने कारवाई करावी, अशी अपेक्षा निसर्गप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
पुणे-बंगलोर महामार्गावरील वाहतुकीला गती मिळावी यासाठी चौपदरीकरण व सहापदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. या कामामध्ये असलेल्या तांत्रिक अडचणींनी प्रवास तर असुरक्षित झालाच आहे; परंतु या कामादरम्यान निसर्गाची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. नवीन क्षेत्र संपादित केल्यानंतर सर्व नियम धाब्यावर बसवून वृक्षतोड करण्यात आली.
महामार्गावरील दुतर्फा असणारी झाडी तोडली गेल्याने पर्यावरणाची हानी झाली आहे. नव्या विस्तारीकरणात रस्त्याच्या दुभाजकातील झाडांवरही कुऱ्हाड चालवली गेली. त्यामुळे महामार्गालगत असणाऱ्या गावांची सावली हरपली. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा दुपारच्या वेळचा विसावाही नष्ट झाला.(चौकट)
पक्ष्यांचा निवारा संपुष्टात
महामार्गावर पूर्वी मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे होती. या झाडांवर अनेक पक्ष्यांची घरटी देखील होती. मात्र ही झाडे तोडली गेल्याने पक्षांचा नैसर्गिक निवारा हरवला. वृक्षतोडीचा फटका केवळ माणसांनाच नव्हे, तर पशु-पक्ष्यांनाही बसला. त्यामुळे महामार्गाच्या दुतर्फा नव्याने वृक्ष लागवड करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.
- पुणे-बेंगलोर महामार्गावर कोल्हापूरपासून पुढे कर्नाटक राज्यात दुभाजकावर मोठ्या प्रमाणात झाडे
- या प्रांतातील ७७ किलोमीटर लांबीच्या महामार्गालगत जवळपास १३५ सुलभ शौचालयांची उभारणी
- महाराष्ट्रात महामार्गालगत कोठेही शौचालये नसल्याने प्रवाशांची कुचंबणा
- कर्नाटक राज्यात जर होऊ शकते, तर महाराष्ट्रात का नाही?, सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न