पंतप्रधान इंटर्नशिप योजना: युवकांना मिळणार दरमहा ५ हजार अन् एकरकमी ६ हजार, अर्ज प्रक्रिया सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:45 IST2025-03-05T17:45:02+5:302025-03-05T17:45:34+5:30
PM Internship Scheme: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत देशातील ७३० जिल्ह्यातील ...

पंतप्रधान इंटर्नशिप योजना: युवकांना मिळणार दरमहा ५ हजार अन् एकरकमी ६ हजार, अर्ज प्रक्रिया सुरू
PM Internship Scheme: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत देशातील ७३० जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. २१ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार असून, दरमहा पाच हजार आणि इंटर्नशीप पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात जास्तीत जास्त युवकांना संधी मिळण्यासाठी सातारा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र प्रयत्नशील आहे.
कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना आहे. या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै २०२४च्या अर्थसंकल्पात केली होती. ही योजना सुरू करण्यामागचा उद्देश बेरोजगार तरुणांना योग्य संधी उपलब्ध करून देणे, हा आहे. या योजनेंतर्गत तरुणांना रोजगारक्षम करण्यासाठी टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळणार आहे.
अर्ज कसा करायचा ?
योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेबसाइटवर प्रोफाइल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करायचा आहे. उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत ३ इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ मार्च आहे.
१२ महिन्यांची इंटर्नशिप
- योजनेंतर्गत युवकांना १२ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. सोबतच त्यांना दरमहा ५ हजार रुपयेही मिळतील. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर ६ हजार एकरकमी अनुदान दिले जाईल. योजनेच्या पायलट प्रोजेक्टवर अंदाजे ८०० कोटी रुपये खर्च येणार आहे.
- पहिल्या फेरीसाठी ऑक्टोबरमध्ये अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. या पथदर्शी टप्प्याची पहिली फेरी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झाली होती. या कालावधीत देशातील एकूण सहा लाखांहून अधिक तरुणांनी अर्ज केले होते.
या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते. याव्यतिरिक्त कंपनी इंटर्नला अतिरिक्त अपघात विमा संरक्षणदेखील प्रदान करते. उमेदवारांनी इंटर्नशिप संधीसाठी http://pminternship.mca.gov.in/ पोर्टलवर नोंदणी करावी. - सुनील पवार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र, सातारा