Satara: बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणाला २० वर्षांची शिक्षा; पीडिता गरोदर राहिल्याने प्रकरण आले होते उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 12:34 IST2025-02-17T12:32:21+5:302025-02-17T12:34:50+5:30
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील एका गावातील १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत तिला गर्भवती केले होते. याप्रकरणी शिरवळ येथील ...

Satara: बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणाला २० वर्षांची शिक्षा; पीडिता गरोदर राहिल्याने प्रकरण आले होते उघडकीस
शिरवळ : खंडाळा तालुक्यातील एका गावातील १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत तिला गर्भवती केले होते. याप्रकरणी शिरवळ येथील एका २६ वर्षीय तरुणाला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. मेहेरे यांनी दोषी ठरवत २० वर्षे कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सूरज महादेव चव्हाण (२६, रा. शिरवळ, ता. खंडाळा), असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
२९ सप्टेंबर २०१९ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीला त्याने घरी बोलावून घेतले. ‘मला भाकरी टाकून दे,’ असे सांगून अल्पवयीन मुलगी भाकरी टाकून देत असताना जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केला. यानंतरही सूरज चव्हाण याने दोन ते तीन वेळा पीडितेवर बलात्कार केला. त्यातून संबंधित मुलगी गरोदर राहिल्याने हे प्रकरण उघडकीस आले.
पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांनी सूरज चव्हाण याला अटक करून तपास करून वाई न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी सूरज चव्हाण याला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवून २० वर्षांचा कारावास ठोठावला.
अतिरिक्त सरकारी वकील महेश शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. त्यांना प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलिस अंमलदार धीरज टिळेकर, अंमलदार काळे, कीर्तीकुमार कदम, घोरपडे, कदम, शिंदे, कुंभार, बांदल यांनी सहकार्य केले.