शिवारात काम करताना अचानक लांडग्याने केला हल्ला, एक युवक व महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 19:28 IST2021-12-23T19:24:34+5:302021-12-23T19:28:20+5:30
शिवारात काम करीत असताना अचानक लांडग्याने हल्ला केला. या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले.

शिवारात काम करताना अचानक लांडग्याने केला हल्ला, एक युवक व महिला जखमी
वाठार : फलटण तालुक्यातील वाखरी गावात लांडग्यांच्या हल्ल्यात एकोणीस वर्षीय युवक व महिला जखमी झाली. स्वप्नील संतोष ढेकळे (वय 19) व सुनंदा मुगुट ढेकळे अशी या जखमींची नावे आहेत. शिवारात काम करीत असताना अचानक लांडग्याने हल्ला केला. या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले.
याबाबत माहिती अशी की, दालवडी ते वाखरी या रस्त्यावर वाखरी गावच्या हद्दीतील झिरप नावाच्या शिवारात शेतकरी काम करीत होते. यावेळी स्वप्नीलवर लांडग्याने अचानक हल्ला केला. यावेळी शेजारी काम करीत असलेल्या सुनंदा ढेकळे याही किरकोळ जखमी झाल्या.
इतर दोन शेतकऱ्यांच्याही अंगावर लांडगा धावून गेला, मात्र त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर लांडग्याने पळ काढला. मात्र या प्रकारच्या हल्ल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून शेतकरी शेतात काम करताना भीती व्यक्त करीत आहेत.
वनविभागाने तातडीने लांडग्याचा बंदोबस्त करावा तसेच जखमी झालेल्या स्वप्नील याला तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संतोष ढेकळे यांनी केली आहे.
या बाबतीत तालुका वन विभागाने अधिकारी मारुती निकम यांच्याशी संपर्क साधला असता उपचारासाठी लागणारा सर्व खर्च आपल्या विभागाकडून देण्यात येईल तसेच सापळा लावून लांडगा पकडून इतरत्र सोडून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. तर, शेतकऱ्यांनी शेतात काम करताना खबरदारी घ्यावी असे आवाहनही केले.