Satara: कामगारांच्या पीएफ, एसआयचे पैसे प्रेयसीच्या खात्यावर वळवले!, संशयिताला अटक अन् पोलिस कोठडी
By नितीन काळेल | Updated: February 23, 2024 12:58 IST2024-02-23T12:58:07+5:302024-02-23T12:58:44+5:30
रक्कम कामगारांच्या खात्यावर आॅनलाईन पाठविल्याच्या खोट्या पावत्याही केल्या

Satara: कामगारांच्या पीएफ, एसआयचे पैसे प्रेयसीच्या खात्यावर वळवले!, संशयिताला अटक अन् पोलिस कोठडी
सातारा : सातारा शहराजवळील धनगरवाडी कोडोली येथील एका कंपनीच्या पर्यवेक्षकाने कामगाराचे पीएफ आणि एसआयची १५ लाख रुपयांची रक्कम प्रेयसीच्या बॅंक खात्यावर पाठवून फसवणूक केली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पर्यवेक्षकाला अटक झाली आहे. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सोमनाथ रामचंद्र किर्दत (रा. चिंचणेर निंब, ता. सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनुसार कंपनी पर्यवेक्षक मंगेश रमेश दुदकर (रा. संगमनगर, सातारा) आणि त्याच्या प्रेयसीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला आहे. दि. २ नोव्हेंबर २०२२ पासून १४ जानेवारी २०२४ पर्यंत संबंधित कंपनीत फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी सांगितले की, धनगरवाडी (कोडोली) येथील एका कंपनीचे बॅंक खाते होते. यामधील १५ लाख रुपयांची रक्कम ही कंपनी पर्यवेक्षक आणि अकाऊंटचे काम पाहणारा मंगेश दुदकर याने प्रेयसीच्या बॅंक खात्यावर वळती केली. १५ लाखांची ही रक्कम कंपनीतील कामगारांची पीएफ आणि एसआयची होती. त्याने कामगारांच्या खात्यावर रक्कम जमा केली नाही. तसेच ही रक्कम कामगारांच्या खात्यावर आॅनलाईन पाठविल्याच्या खोट्या पावत्याही केल्या होत्या. त्यामुळे मंगेश दुदकर आणि त्याच्या प्रेयसीविरोधात फसवणुकीचा तक्रार देण्यात आली.
सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मंगेश दुदकर याला अटक केली आहे. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शिरोळे हे तपास करीत आहेत.