चहामधून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 16:28 IST2019-09-19T16:26:44+5:302019-09-19T16:28:25+5:30
खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये एका महिलेवर चहातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

चहामधून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार
सातारा : खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये एका महिलेवर चहातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.
गुलाबराव खाशाबा निगडे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खंडाळा तालुक्यातील एका गावात संबंधित महिला वास्तव्यास असून, तिच्या पतीचे नुकतेच जून महिन्यामध्ये अपघाती निधन झाले आहे. संबंधित महिला एका अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी संबंधित पीडित महिला साफसफाई व बेन्टेक्स धातूचे दागिने विकण्याचे काम करत होती.
दरम्यान, १२ जुलै रोजी गुलाबराव निगडे याने संबंधित महिलेला माझ्या मित्राच्या घराची साफसफाई करायची आहे,असे सांगून मित्राच्या घरी बोलावून घेतले. यावेळी गुलाबराव निगडे याने संबंधित महिलेला त्याठिकाणी चहा घेण्यास सांगितले. महिलेने चहा पिल्यानंतर चक्कर यायला लागली. मला चक्कर येत असल्याचे महिलेने सांगताच गुलाबराव निगडे याने तू पावसातून आली असल्याने थकवा जाणवत असेल, असे सांगितले. त्यानंतर निगडे याने महिलेला मारहाण करत जबरदस्तीने अत्याचार केला.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादिवरून पोलिसांनी गुलाबराव निगडे याच्यावर शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन निगडेला अटक केली. खंडाळा न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे ,पोलीस हवालदार अमोल जगदाळे हे करीत आहेत.