दुचाकीच्या चाकात साडी अडकून पडल्याने महिलेचा मृत्यू, साताऱ्यातील घटना
By दीपक शिंदे | Updated: February 25, 2023 16:38 IST2023-02-25T16:38:12+5:302023-02-25T16:38:41+5:30
सातारा शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद

दुचाकीच्या चाकात साडी अडकून पडल्याने महिलेचा मृत्यू, साताऱ्यातील घटना
सातारा : पतीसोबत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिलेची साडी चाकात अडकून अपघात घडला. यात महिला रस्त्यावर पडल्याने जखमी झाली असता, तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार, दि. २४ रोजी खेड गावच्या हद्दीतील कॅनाॅलजवळ झाला.
सुगंधा सुरेेंद्रन (मूळ रा. केरळ, सध्या रा. सातारा) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाॅम्बे रेस्टाॅरंट चाैकातून दुचाकीवरून दाम्पत्य वाढे फाट्याकडे निघाले होते. सुगंधा या पाठीमागे बसल्या होत्या. खेड गावच्या हद्दीतील कॅनाॅलजवळ आल्यानंतर त्यांची साडी दुचाकीच्या चाकामध्ये अडकली. त्यामुळे त्या दुचाकीवरून खाली पडल्या.
यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सातारा शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.