Satara: मलकापुरातील उड्डाणपुलाचे गरडर मशीन उतरवणार?, वाहतुकीबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 14:29 IST2025-07-25T14:28:52+5:302025-07-25T14:29:09+5:30
मलकापूर : मलकापुरातील युनिक उड्डाणपुलाचे सिगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी वापरलेले भले मोठे गरडर मशीन उतरवण्यात ...

Satara: मलकापुरातील उड्डाणपुलाचे गरडर मशीन उतरवणार?, वाहतुकीबाबत वाहनचालकांमध्ये संभ्रम
मलकापूर : मलकापुरातील युनिक उड्डाणपुलाचे सिगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी वापरलेले भले मोठे गरडर मशीन उतरवण्यात येणार असून या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याचे मेसेज समाज माध्यमावर व्हायरल झाल्यामुळे वाहनधारकासह नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्लिपरोड सुरु करूनच नियोजनबद्द काम करावे अशी मागणी होत आहे.
मलकापूर, ता. कराड येथील युनिक उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून सिगमेंट बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या उड्डाणपूलाच्या सर्वच ९२ पिलरचे पायलिंग, कास्टिंग व कॕपसह उभे राहिले आहेत. अत्याधुनिक दोन गरडर मशिनद्वारे सिगमेंट बसवून पुलाचे एका ठिकाणी ५२ तर दुसऱ्या ठिकाणी ४० असे ९२ गाळे तयार झाले आहेत. बेअरिंग व जोड बसवण्याबरोबरच संरक्षक कठड्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. दोन्ही बाजूच्या भरावपुलाची कामे सुरू आहेत. सध्या गरडर मशीनचे काम संपले आहे. ते करडर मशीन उड्डाण पुलावरून खाली उतरवण्याचा घाट संबंधित कंत्राटदाराने घातला आहे. त्याबाबतची जुळवाजुळव सुरू आहे.
भल्या मोठ्या क्रेनने हे गरडर मशीन उतरवण्यात येणार आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून कोणतीही पूर्वसूचना वाहतूक नियंत्रण कक्षाला दिलेली नाही. किंवा वाहतूक व्यवस्थेत बदल केलेले कोणतेही दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. आज, शुक्रवार (दि. २५) हे काम १५ ते २० दिवस चालणार असल्याचे मेसेज समाज माध्यमावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
महामार्गाचे काम करणारे कंत्राटदार वाहतुकीचे पुर्वनियोजन न करताच मनमानीपणे बदल करत आहेत. गरडर मशीन उतरवण्यासाठी कसलीही लेखी कल्पना दिलेली नाही. प्रथम स्लिपरोड वरून वाहतूक सुरु करावी. वाहतुकीत केलेल्या बदलाचे दिशादर्शक फलक लावूनच हे काम करावे. - संदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कराड वाहतूक शाखा
सध्या गरडर मशीनने सिगमेंट बसवण्याचे काम संपले आहे. भल्या मोठ्या क्रेनने हे गरडर मशीन उतरावे लागणार आहे. त्यासाठी शिवछावा चौकात क्रेन बसवत आहोत. अजून किमान चार दिवस लागतील. वाहतुकीचे नियोजन करूनच हे काम करणार आहोत. - सुरेंद्र आपटे, प्रोजेक्ट मॅनेजर