मनसंधारणामुळे गावांना मिळालं नवरूप - वॉटर कप स्पर्धा : चला गाव बदलूया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:04 IST2019-03-13T22:00:41+5:302019-03-13T22:04:34+5:30
दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच टँकरचे पाणी डोक्यावरून घागर घेऊन जाणारे पुरुष आणि कमरेवरून हंडा घेऊन पाणी भरणाऱ्या महिला यंदा पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षण केंद्रावर सहभागी झाल्या

पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेसाठी अनपटवाडी, ता. कोरेगाव येथे उभारण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रात लहान, तरुण, महिला व वृद्ध उत्सुकतेने जलसंधारणाचे विज्ञान शिकत आहेत.
सातारा : दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच टँकरचे पाणी डोक्यावरून घागर घेऊन जाणारे पुरुष आणि कमरेवरून हंडा घेऊन पाणी भरणाऱ्या महिला यंदा पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षण केंद्रावर सहभागी झाल्या आहेत. जलसंधारणाचे विज्ञान शिकल्यानंतर वॉटर कप स्पर्धेत काम करण्याचा त्यांचा उत्साह दुपटीने वाढला आहे.
पाणी फाउंडेशनच्या चौथ्या टप्प्याला ८ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. गेल्या तीन वर्षांत वॉटर कप स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील अनेक गावांना चांगले यश मिळाले आहे. त्यामध्ये वेळू, अनपटवाडी, टाकेवाडी, भांडवली या गावांमध्ये केलेल्या जलसंधारणाच्या कामांची राज्यभरात दखल घेतली गेली. यंदा या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सुमारे सात हजार गावांनी सहभाग नोंदवला असून, सातारा जिल्ह्यातील २८८ गावांमध्ये स्पर्धेचं तुफान आलं आहे. यंदा स्पर्धेत माण तालुक्यातील ८२, कोरेगावमधील ८१ व खटावमधील १२० गावांचा समावेश आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांमधील प्रत्येकी पाच व्यक्तींसाठी प्रशिक्षणांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या प्रशिक्षणासाठी कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी, हिवरे, माण तालुक्यातील भांडवली, खटाव तालुक्यातील भोसरे व कटगुण आदी गावांमध्ये प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी दुष्काळी भागातील टंचाईग्रस्त गावांमधील शाळकरी मुलांसह, युवक, महिला आणि वृद्धांचा समावेश आहे.
पाणी फाउंडेशनच्या समन्वयकांकडून गावांमध्ये करावयाच्या कामांची तांत्रिक माहिती घेऊन जलसंधारणाचे बारकावे शिकून घेण्याचा प्रयत्न घेत आहे. आतापर्यंत साधारण एक हजार पुरुष, महिलांनी सहभाग नोंदवला आहे. प्रशिक्षण घेतल्याने त्यांचा उत्साह वाढला असून, गावात जाऊन इतर ग्रामस्थांनाही ते जलसंधारणाचं तंत्र समजावून सांगत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचे मनसंधारण होत असून, गावाला नवरूप आलं आहे. गावांमध्ये आतापासून सुरुवात झाली आहे.
दुष्काळग्रस्त भागातील अनेक गावे सुरुवातीला प्रशिक्षणास येत नव्हती. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून त्यांना विविध जलसंधारणाच्या कामांची माहिती देण्यात आली. हसत-खेळत जलसंधारणाचे विज्ञान शिकताना त्यांची धमाल शाळा भरली आहे. प्रशिक्षण पूर्ण करून गावी परतलेल्या अनेक गावांमध्ये शोषखड्डे, सांडपाणी व्यवस्थाबाबत काम सुरू झाले आहे.
-बाळासाहेब शिंदे,
जिल्हा समन्वयक, पाणी फाउंडेशन