सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा १०० टीएमसीच्या दिशेने; कोयनेत दररोज २ ते ३ टीएमसीने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:44 IST2025-07-05T19:42:09+5:302025-07-05T19:44:53+5:30
साडे सात हजार क्यूसेक विसर्ग

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा १०० टीएमसीच्या दिशेने; कोयनेत दररोज २ ते ३ टीएमसीने वाढ
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून धरणक्षेत्रातही दमदार हजेरी आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागलाय. शनिवारी प्रमुख ६ धरणांतील पाणीसाठा ९४ टीएमसीवर पोहोचला होता. तर कोयनेत दररोज सरासरी २ ते ३ टीएमसीने वाढ आहे. त्यामुळे कोयनेतील साठाही ६४ टीएमसी झाला. तर सध्या तीन धरणांतून सुमारे साडे सात हजार क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे.
जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या अधिक पर्जन्यमान झाले. यामुळे छोटे पाणी प्रकल्प भरुन वाहू लागले आहेत. तसेच ओढेही वाहत आहेत. पण, या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांवर मोठा परिणाम झालेला आहे. अशातच अजुनही पाऊस सुरूच आहे. विशेष करुन पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक आहे. सातारा तालुक्याचा पश्चिम भाग, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यात दमदार पाऊस होत आहे. त्याचबरोबर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी या प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढलाय. सध्या या सहा धरणातील साठा ९४ टीएमसीवर पोहोचला आहे.
शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६४ मिलिमीटर पाऊस पडला. तर नवजा येथे ६८ आणि महाबळेश्वरला ५५ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. या पावसामुळे कोयना धरणात २८ हजार क्यूसेक पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ६३.८८ टीएमसी झाला होता. ६०.६९ टक्के हा साठा आहे. त्यातच इतर प्रमुख धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. धोम धरणातील पाणीसाठाही ९ टीएमसीवर गेला आहे. जवळपास ६७ टक्के साठा झालाय.
कण्हेर धरण १०.१० टीएमसी क्षमतेचे आहे. सध्या या धरणात ७.३२ टीएमसी साठा झालाय. उरमोडी धरणातही ७.२४ टीएमसी म्हणजे ७३ टक्क्यांजवळ पाणीसाठा पोहोचलाय. सध्या कोयनासह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या धरणांत ९४ टीएमसीहून अधिक पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे ही धरणे भरण्यासाठी अजून ५४ टीएमसीची आवश्यकता आहे.
कण्हेर ३०१८, उरमोडीतून ३३८६ विसर्ग सुरू..
जिल्ह्यातील अनेक धरणे भरु लागली आहेत. त्यातच पावसाळ्याचे अजून पावणे तीन महिने बाकी आहेेत. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग सुरू झालेला आहे. कोयनातून १ हजार ५० क्यूसेक विसर्ग होत आहे. तर कण्हेर धरणातून ३ हजार १८ आणि उरमोडीमधून ३ हजार ३८६ विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील पाणीसाठा ७० टीएमसीवर गेल्यानंतर दरवाजातून विसर्ग सुरू होण्याचा अंदाज आहे.
कोयनेचा पाऊस १८७० मिलिमीटर..
एक जूनपासून जिल्ह्यात सर्वत्रच चांगला पाऊस झालेला आहे. तरीही पश्चिम भागात अधिक पर्जन्यमान झाले आहे. कोयनानगर येथे १ हजार ८७०, नवजा येथे १ हजार ६६४ आणि महाबळेश्वरमध्ये १ हजार ७४० मिलिमीटर पाऊस झालेला आहे. मागीलवर्षीपेक्षा यंदा पाऊस अधिक झाला आहे.