साताऱ्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 16:56 IST2020-04-17T16:54:21+5:302020-04-17T16:56:25+5:30
तलावात दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असला तरी पाऊस लांबणीवर गेल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. घंटेवारीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पाण्याचा काटकसरीने वापर करावा,

साताऱ्यात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात
सातारा : उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाईची समस्या पाहता सातारा नगरपालिकेने यंदाही कास व शहापूर योजनेच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आठवड्यातून एक दिवस प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहेत. याची अंमलबजावणी सोमवार, दि. २० पासून केली जाणार आहे.
साता-याला पाणीपुरवठा करणाºया कास जलाशयाची पाणीपातळी १० फूट ११ इंचांवर आली आहे. उन्हाळा सुरू होण्यासाठी आणखीन दोन महिने कालावधी आहे. या कालावधीत पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. उन्हाळा सुरू झाला की सातारकरांना पाणीटंचाईची समस्या भेडसावते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गेल्या आठवड्यात उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर यांच्यासह अधिकाऱ्यांनी कास जलाशयाची पाहणी केली होती. यावेळी पाणी कपातीबाबत चर्चाही झाली. अखेर कपातीच्या निर्णयावर एकमत झाले.
सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणी कपातीच्या निर्णयानुसार प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जाणार आहे. या निर्णयामुळे रोज १३ लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे.
तलावात दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असला तरी पाऊस लांबणीवर गेल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. म्हणून पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. घंटेवारीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर, मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले आहे.