Satara: कराडला युती अन् आघाडीत बिघाडी!, तिरंगी लढत होणार
By प्रमोद सुकरे | Updated: November 18, 2025 19:16 IST2025-11-18T19:15:52+5:302025-11-18T19:16:33+5:30
Local Body Election: भाजपकडून पावसकर, काँग्रेसकडून पठाण तर आघाडीकडून यादव रिंगणात

Satara: कराडला युती अन् आघाडीत बिघाडी!, तिरंगी लढत होणार
प्रमोद सुकरे
कराड : कराड नगरपालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल केले. पण त्याचवेळी दुपारपर्यंत पक्ष, आघाड्यांनी अधिकृत उमेदवारांना पत्र दिल्यानंतर युती व महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली. तर स्थानिक आघाड्यांनी पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले.
कराड पालिकेची निवडणूक भाजप पक्ष चिन्हावर लढवणार असे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सुरुवातीला सांगितले होते. त्यामुळे महायुतीची शक्यता सुरुवातीपासूनच धूसर झाली होती. पण तरी देखील शिंदेसेनेचे नेते राजेंद्र यादव यांनी याबाबतच्या चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते. पण प्रत्यक्षात सोमवारी भाजपने विनायक पावसकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देत २ प्रभाग वगळता पक्षीय चिन्हावर आपले उमेदवार उभे केले.
तर युतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेसेना व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक आघाडीचा पर्याय निवडत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या लोकशाही आघाडी बरोबरच काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत अर्ज दाखल केले. तर त्यात शिंदेसेनेच्या राजेंद्रसिंह यादव यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी निश्चित केली.
या सगळ्यात राष्ट्रीय काँग्रेसने मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्वबळाचा नारा देत झाकीर पठाण यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. सुमारे २० ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
ठळक घडामोडी
- शिंदेसेनेचे समर्थक रणजीत पाटील यांनी मात्र थेट नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत राजेंद्र यादव यांनाच आव्हान दिले आहे.
- काँग्रेसने नगराध्यक्षपदासह इतर काही ठिकाणी पक्ष चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केले असताना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे बंधू ऋतुराज मोरे यांचा अर्ज मात्र राजेंद्र यादव यांच्या यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून दाखल झाला आहे.
- शिंदेसेनेचे नेते राजेंद्रसिंह यादव यांचे निकटवर्तीय, नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी आज ऐनवेळी भाजपमधून उमेदवारी अर्ज दाखल करत धक्का दिला आहे.
- गेल्या काही दिवसांपासून यशवंत विकास आघाडी पासून अलिप्त राहिलेल्या माजी बांधकाम समिती सभापती हणमंत पवार यांनी सोमवारी राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीतूनच पत्नी विजया पवार यांचा अर्ज दाखल केला.