सातारा : माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य शासनाने पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील वरुड, कळंबे आणि समर्थगाव ग्रामपंचायतीने विभागस्तरावर विविध गटांत यश मिळवले. या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. तसेच, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि खंडाळा व पाटण गटविकास अधिकाऱ्यांचा सर्वोत्तम अधिकारी म्हणूनही गाैरव होणार आहे. यामुळे सातारा जिल्ह्याचा या अभियानात डंका वाजला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने पृश्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांत २ ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यास सुरुवात झाली. तर, माझी वसुंधरा अभियान ५.० हे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांत १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या काळात राबविण्यात आले. अभियानात सर्वोत्तम ठरलेल्या संस्थांना रोख रकमेची बक्षिसे जाहीर करण्यात आलेली आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातीलही अनेक संस्थांना बक्षीस जाहीर झालेले आहे.ग्रामपंचायत विभागात २ ते ३ हजार लोकसंख्या गटात पुणे विभागस्तरावर खटाव तालुक्यातील वरुड ग्रामपंचायतीला बक्षीस मिळाले आहे. दीड ते दोन हजार लोकसंख्या गटात विभागस्तरावर सातारा तालुक्यातील कळंबे ग्रामपंचायत, तर एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात विभागस्तरावर सातारा तालुक्यातील समर्थगाव ग्रामपंचायतीला बक्षीस मिळाले आहे. या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० लाख मिळणार आहेत.राज्यस्तरावर अधिकाऱ्यांसाठीही सर्वोत्तम कामगिरीबद्दल बक्षिसे होती. यामध्ये सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा राज्यस्तरावर तृतीय क्रमांक आला आहे. विभागस्तरावर सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा प्रथम क्रमांक आला आहे. तसेच, विभागस्तरावर खंडाळा गटविकास अधिकारी यांनाही सर्वोत्तम कामगिरीबद्दल तृतीय बक्षीस जाहीर झाले आहे. जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी करणारे गटविकास अधिकारी म्हणून सातारा जिल्ह्यातून पाटणच्या गटविकास अधिकाऱ्यांची निवड झालेली आहे.दरम्यान, या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सीद, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई आदींनी विजेत्या गावांचे काैतुक केले.
२१ फेब्रुवारीला बक्षीस वितरण...माझी वसुंधरा अभियान ५.० मधील सर्वोतम कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती आणि अभियान ४.० मध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त जिल्ह्यातील मान्याचीवाडी, ता. पाटण ग्रामपंचायतीचा सन्मान सोहळा दि. २१ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे होणार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.
माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी यश मिळवले. यामुळे जिल्ह्याचा नावलाैकिक आणखी वाढण्यास मदत झालेली आहे. ग्रामस्थ, शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नातून हे यश प्राप्त झाले. यापुढेही शासनाच्या योजना, अभियान यशस्वी करून जिल्ह्याचा नावलाैकिक वाढवू. ग्रामपंचायतीबरोबरच सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचेही अभिनंदन. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी
Web Summary : Satara's Varud, Kalambe, and Samarthgav win ₹50 lakh each in Majhi Vasundhara Abhiyan 5.0. District officials also recognized for outstanding performance. Awards ceremony on February 21st in Mumbai.
Web Summary : सतारा के वरुड, कलंबे और समर्थगाव ने 'मेरी वसुंधरा अभियान 5.0' में 50 लाख रुपये जीते। उत्कृष्ट प्रदर्शन के लिए जिला अधिकारियों को भी सम्मानित किया गया। पुरस्कार समारोह 21 फरवरी को मुंबई में।