Satara News: महाबळेश्वरला अवकाळी पावसाने झोडपले; पर्यटक, नागरिकांची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 18:12 IST2023-03-16T18:12:31+5:302023-03-16T18:12:53+5:30
पावसामुळे स्ट्रॅाबेरीच्या फळाचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्गातून चिंतेचे वातावरण

Satara News: महाबळेश्वरला अवकाळी पावसाने झोडपले; पर्यटक, नागरिकांची उडाली तारांबळ
अजित जाधव
महाबळेश्वर: तापमानाचा पारा वाढत असतानाच शहर व परिसरामध्ये गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण होते. यातच आज, गुरूवार अखेर साडेतीन वाजल्यापासून महाबळेश्वर शहरपरिसरात मुसळधार अवकाळी पावसाला सुरूवात झाली. तब्बल एक तासात अवकाळी पावसाने महाबळेश्वरला चांगलेच झोडपून काढले.
महाबळेश्वर शहर सोडून दोन दिवस पाचगणी, वाई याठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर आज दुपारी अचानक महाबळेश्वरमध्ये देखील पावसाने हजेरी लावल्यामुळे पर्यटक, वाहनधारकांसह विक्रेते व नागरिकांची काही काळ त्रेधातिरपीट उडाली. साडेतीन वाजल्या पासून वीजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे शहराचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तर मोबाईलचे नेटवर्क ही बंद झाले होते. यामुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांची अधिक तारांबळ उडाली.
बाजारपेठ परिसरातील रस्ते, नाले पाण्याने ओसंडून वाहू लागले होते. तर बस डेप्पो परिसरात अक्षरशा ड्रेनेज लाईन ओसंडून मैला रस्त्यावर आल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली होती. मार्च महिना सुरू असल्यामुळे महाबळेश्वरात पर्यटकाची तुरळक गर्दी होती. काही पर्यटकांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.
या पावसामुळे स्ट्रॅाबेरीच्या फळाचे मोठे नुकसान झाल्यामुळे शेतकरी वर्गातून चिंतेचे वातावरण होते. या पावसानंतर गारवा निर्माण झालेला होता. सायंकाळी वेण्णालेक, मुंबई पॅाईट, मुख्यबाजरपेठत पर्यटकाची चांगलीच वर्दळ वाढलेली दिसून आली.