मैत्री कर नाहीतर.., अज्ञाताने तरुणीला दिली धमकी; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 19:20 IST2022-02-18T19:20:18+5:302022-02-18T19:20:39+5:30
अज्ञात माथेफिरुविरोधात पोलीस ठाण्यात तरुणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल

मैत्री कर नाहीतर.., अज्ञाताने तरुणीला दिली धमकी; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सातारा : येथील उपनगरात राहणाऱ्या एका मुलीला अज्ञात व्यक्तीने तिच्या राहत्या घरी चिठ्ठी पाठवून ‘माझ्याशी मैत्री कर नाहीतर तुझा चेहरा ॲसिडने जागेवर ठेवणार नाही,’ अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाची पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, शहरातील एका उपनगरात आत्याच्या घरी राहणारी २२ वर्षीय तरुणी खासगी नोकरी करते. एक अज्ञात माथेफिरु नकळत तिचा सतत पाठलाग करत होता. मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिनापासून या माथेफिरुने तरुणीला त्रास द्यायला सुरुवात केली. तिची मैत्री मिळविण्यासाठी या माथेफिरुने तिला चिठ्ठ्या लिहिल्या. हा प्रकार कधी तरी थांबेल, असे समजून ही तरुण गप्प राहिली.
मात्र हा प्रकार वाढतच गेला. धमकी देणाऱ्या चार चिठ्ठया तिच्या घरी आल्या. १४ फेब्रुवारी रोजी साडेबाराच्या सुमारास तिचा आत्तेभाऊ आणि या तरुणीच्या नावे माथेफिरुने चिठ्ठी पाठवली. या चिठ्ठीतही लज्जा उत्पन्न होईल, असा मजकूर लिहिलेला होता. तसेच ‘तुझ्याशी मैत्री करायची आहे, नाहीतर मी तुझा चेहरा ॲसिडने जागेवर ठेवणार नाही,’ अशी धमकीच या माथेफिरुने दिली.
दरम्यान, या प्रकरणी अज्ञात माथेफिरुविरोधात पोलीस ठाण्यात तरुणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तरुणीच्या जीवाला धोका असल्याने या माथेफिरुला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी पीडीत कुटुंबाने केलेली आहे.
चार चिठ्ठ्या पाठवल्या...
या तरुणीला धमकी देणाऱ्या चार चिठ्ठ्या पाठवल्या गेल्या. तरी देखील ही मुलगी सहन करत राहिली. सलग चार महिन्यांपासून हा प्रकार होत होता. तरी देखील पोलिसांत तक्रार दाखल केली गेली नव्हती. आता तर ॲसिडने चेहरा जाळण्याची धमकीच दिली गेल्याने ही तरुणी व तिच्या कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून धमकी देणाऱ्या अज्ञात माथेफिरुविरोधात तक्रार दाखल केली.