शिवशाही बसची अज्ञात मालट्रकला पाठीमागून धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 13:02 IST2019-04-22T13:00:49+5:302019-04-22T13:02:46+5:30
पुण्याहून मालवणकडे जात असलेल्या शिवशाही बसची अज्ञात मालट्रकला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवासी किरकोळ जखामी झाले. पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर येथील अक्षता मंगल कार्यालयासमोर रविवारी मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संबंधित मालट्रक पसार झाला.

शिवशाही बसची अज्ञात मालट्रकला पाठीमागून धडक
मलकापूर : पुण्याहून मालवणकडे जात असलेल्या शिवशाही बसची अज्ञात मालट्रकला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवासी किरकोळ जखामी झाले. पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर येथील अक्षता मंगल कार्यालयासमोर रविवारी मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संबंधित मालट्रक पसार झाला.
अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवशाही बसचालक दयासागर मारुती गोने (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर ) हे बस (एमएच ०४ एचवाय ५२६३) रविवारी रात्री पुण्याहून प्रवासी घेऊन मालवणकडे जात होते. बस मध्यरात्रीनंतर सव्वादोन वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगलोर महामार्गावर येथील अक्षता मंगल कार्यालयासमोर आली असता बसवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे कोल्हापूर दिशेने निघालेल्या अज्ञात मालट्रकला पाठीमागून जोरदार धडक झाली.
धडक एवढी जोरात होती की बसच्या क्लिनर बाजूचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात प्रवासी झोपेत असल्यामुळे आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात होताच मालट्रक चालक ट्रकसह पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभालचे कर्मचारी दस्तगीर आगा, रमेश खुने, अमित पवार घटनास्थळी दाखल झाले.
जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमींना किरकोळ उपचार करून सोडून देण्यात आले. अपघातग्रस्त बस महामार्गावरून बाजूला करून महामार्ग वाहतुकीस खुला केला. अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.