सातारा नगरपालिकेत उदयनराजेंचे धक्कातंत्र; दत्ता बनकर उपनगराध्यक्ष!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 14:47 IST2026-01-23T14:45:49+5:302026-01-23T14:47:17+5:30
पाचजणांना ‘स्वीकृत’ची लॉटरी

सातारा नगरपालिकेत उदयनराजेंचे धक्कातंत्र; दत्ता बनकर उपनगराध्यक्ष!
सातारा : सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाबाबत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यावर गुरुवारी पडदा पडला. खासदार उदयनराजे भोसले यांनी ऐनवेळी ॲड. दत्तात्रय बनकर यांचे नाव पुढे करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बनकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केली.
सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात गुरुवारी सकाळी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सभा सचिव वर्षा पाटील यांनी उपनगराध्यक्ष निवडीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. यानंतर निवड प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळी ११ ते १२ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वतः उपस्थित राहून उपनगराध्यक्ष पदासाठी ॲड. बनकर यांचा अर्ज मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे दाखल केला. या पदासाठी एकमेव अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली.
उदयनराजेंच्या या 'गुगली'मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, दत्ता बनकर यांच्या निवडीने सातारा विकास आघाडीत नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी पालिकेचे गटनेते अविनाश कदम, पक्षप्रतोद निशांत पाटील, नगरसेवक धनंजय जांभळे, प्रशांत आहेरराव, नगरसेविका मुक्ता लेवे, आशा पंडित, राजू गोरे यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते.
स्वीकृत सदस्यपदी दिग्गजांची वर्णी
उपनगराध्यक्ष निवडीसोबतच पाच स्वीकृत नगरसेवकांची प्रक्रियाही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये दोन्ही राजेंच्या समर्थकांना संधी देण्यात आली. उदयनराजे गटाकडून पंकज चव्हाण आणि माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, तर शिवेंद्रसिंहराजे गटाकडून रवी पवार, सुनील भंडारी आणि रीना भणगे यांना स्वीकृतची लॉटरी लागली. या पाचही अर्जांची छाननी वैध ठरल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
नूतन नगरसेवकांना 'कायद्याची' भेट
निवडीनंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या हस्ते सर्व नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाची सखोल माहिती व्हावी, यासाठी 'महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५' हे कायद्याचे पुस्तक भेट देण्यात आले.
कार्यकर्त्यांकडून जल्लोष
या निवडी पार पडल्यानंतर नूतन उपनगराध्यक्षांना नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी त्यांच्या दालनात आदरपूर्वक स्थानापन्न केले. या ठिकाणी ॲडव्होकेट दत्ता बनकर यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ लागली. बनकर यांच्या समर्थकांकडून कार्यालयातच गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.