Satara Municipal Council Election Results 2025: साताऱ्यात अपक्षांच्या पाठिंब्याने वाढली उदयनराजे यांची ताकद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 18:59 IST2025-12-24T18:58:16+5:302025-12-24T18:59:42+5:30
जनसेवेसाठी लढण्याचा दिला कानमंत्र

Satara Municipal Council Election Results 2025: साताऱ्यात अपक्षांच्या पाठिंब्याने वाढली उदयनराजे यांची ताकद!
सातारा : सातारा नगरपालिकेच्या रणांगणातील धुरळा आता शांत झाला असला, तरी राजकीय समीकरणांची गणिते वेगाने बदलू लागली आहेत. निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर आता अपक्ष उमेदवारांनी आपला कल स्पष्ट केला असून, बुधवारी पाच अपक्ष आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराने खासदार उदयनराजे भोसले यांना जाहीर पाठिंबा दिला. या नव्या समर्थनामुळे सातारा पालिकेत उदयनराजेंच्या गटाचे संख्याबळ आता २८ वर पोहोचले असून, त्यांचे राजकीय वजन पुन्हा एकदा वाढले आहे.
नवनिर्वाचित नगरसेवक आणि पाठिंबा देणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी बुधवारी पुणे येथे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी दमयंतीराजे भोसले यांचीही प्रमुख उपस्थिती होती. उदयनराजेंनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांच्याशी संवाद साधला. ‘केवळ सत्ता उपभोगण्यासाठी नाही, तर जनसेवेसाठी वाहून घेण्याचा कानमंत्र त्यांनी यावेळी नवनिर्वाचित सदस्यांना दिला. प्रभागात कोणी विरोधात काम केले हे जाणून घेतानाच, विकासकामांसाठी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा उदयनराजे यांनी सत्कार केला.
असे वाढले उदयनराजेंचे संख्याबळ
सातारा विकास आघाडीने २२ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी १९ उमेदवार विजयी झाले. आता यामध्ये पाच अपक्ष आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराची भर पडली आहे. याशिवाय, प्रभाग २१ मधून बिनविरोध निवडून आलेल्या आशा पंडित, प्रभाग २५ मधील सिद्धी पवार आणि तर प्रभाग २४ मधील शुभांगी काटवटे यांनीही उदयनराजेंना समर्थन दिले आहे. या सर्व घडामोडींमुळे उदयनराजे गटाची सदस्य संख्या आता २८ झाली असून पालिकेतील त्यांची पकड अधिक मजबूत झाली आहे. अपक्ष नगरसेवक सागर पावसे हेदेखील उदयनराजे यांना समर्थन देणार आहेत.
या अपक्षांनी दिले समर्थन
प्रशांत आहेरराव, सावित्री बडेकर, विनोद मोरे, मयूर कांबळे, जयश्री जाधव, संकेत साठे (शिवसेना)
उदयनराजे गटाचे बलाबल असे...
- सातारा विकास आघाडी १९
- समर्थक उमेदवार ०३
- पाठिंबा दिलेले अपक्ष ०५
- शिवसेना समर्थक ०१
- एकूण संख्याबळ २८