Two youths killed in road accidents in Satara district | सातारा जिल्ह्यात विविध अपघातात दोन युवक ठार
सातारा जिल्ह्यात विविध अपघातात दोन युवक ठार

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात विविध अपघातात दोन युवक ठारभरधाव रिक्षा उभ्या कारला धडकली; तीन गंभीर जखमी

सातारा : जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाल्याची घटना रविवारी घडली. मयूर शंकर काटकर (वय २३, रा. तांदूळवाडी, ता. कोरेगाव), विनोद बळीराम बांदल (वय २३, रा. नेवलेकरवाडी पो. करंदी, ता. जावळी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, विनोद बांदल हा शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भुर्इंजहून पाचवडकडे मोटारसायकलवरून निघाला होता. यावेळी पाचवड येथे लक्झरी बसला त्याची जोरदार धडक बसली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दुसरा अपघात कोरेगाव येथे झाला. मयूर काटकर हा कोरेगाव येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याचा रविवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा नेमका कसा झाला, हे रुग्णालयातील पोलिसांना समजले नाही.

भरधाव रिक्षा उभ्या कारला धडकली; तीन गंभीर जखमी
 

 नातेवाईकांच्या यात्रेवरून परतताना भरधाव रिक्षा रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडकल्याने रिक्षाचालकासह चारजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास झाला.

विजय शंकर मोरे (वय ४२, रिक्षाचालक रा. कारी, ता. सातारा), श्रावण साहेबराव पवार (वय ३१, रा. आंबळे, ता. सातारा), पिंटू मोतीराम जाधव (वय ३८, रा. आसनगाव, ता. सातारा), अशी जखमींची नावे आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, परळी भागामध्ये रविवारी यात्रा होती. या यात्रेसाठी हे सर्वजण रिक्षाने तेथे गेले होते. परळीहून कारीकडे जात असताना परळी येथील मंदिराजवळ एक कार उभी होती. या कारला धरधाव रिक्षा समोरून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला.

रिक्षाचालक विजय मोरे यांच्यासह श्रावण पवार, पिंटू जाधव, किरण पवार हेही गंभीर जखमी झाले. या सर्व जखमींना रुग्णवाहिकेने तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, किरण पवार हा उपचार न घेताच रुग्णालयातून निघून गेला.

इतर तिघांवर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील पोलिसांनी या तिघांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता सर्वांनी मद्यप्राषन केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या प्रकारची नोंद सिव्हिलमधील रजिस्टरमध्ये केली आहे.


Web Title: Two youths killed in road accidents in Satara district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.