साताऱ्यात डॉक्टरकडून १२ लाखाची खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 16:50 IST2020-09-26T16:47:22+5:302020-09-26T16:50:25+5:30
अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत एका डॉक्टराकडून तब्बल ६० लाखांची मागणी करून त्यातील १२ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. या प्रकारामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे.

साताऱ्यात डॉक्टरकडून १२ लाखाची खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांना अटक
सातारा: अश्लील क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत एका डॉक्टराकडून तब्बल ६० लाखांची मागणी करून त्यातील १२ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या दोन महिलांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. या प्रकारामुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे.
श्रद्धा उर्फ प्राची अनिल गायकवाड, निकिता पाटील (रा. सोमवार पेठ, सातारा) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत तर पूनम पाटील ही महिला पसार झाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की साताऱ्यातील एका ४६ वर्षीय डॉक्टरची संबंधित तीन महिलांपैकी एका महिलेची ओळख होती.
या ओळखीतून दोघांमध्ये घनिष्ठ संबंध निर्माण झाले होते. या संबंधाची व्हिडीओ क्लिप आणि फोटो संबंधित महिलेने स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. या व्हिडिओचा आधार घेऊन या तिन्ही महिला संबंधित डॉक्टरला ब्लॅकमेल करू लागल्या. गत दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.
डॉक्टरांकडून तब्बल ६० लाखाची खंडणीची मागणी त्यांनी केली होती. जर हे पैसे दिले नाही तर पोलीस ठाण्यात तक्रार करेन आणि हॉस्पिटलवर मोर्चा आणून बदनामी करीन, अशी धमकी या महिलांनी संबंधित डॉक्टरला दिली होती. त्यामुळे भीतीपोटी डॉक्टरने १२ लाख ५ हजार रुपये दिले.
उर्वरित ४८ लाखासाठी संबंधित महिला डॉक्टरला त्रास देऊ लागल्या. त्यामुळे या त्यांच्या त्रासाला कंटाळून संबंधित डॉक्टराने शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी या प्रकारची तत्काळ दखल घेऊन संबंधित महिलांना पकडण्यासाठी सापळा लावला. या सगळ्यांमध्ये दोन्ही महिला अलगद अडकल्या असून, त्यांच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.