ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पाचगणी घाटातील घटना; अपघातानंतर ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:06 IST2019-01-31T17:03:51+5:302019-01-31T17:06:25+5:30
वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकही उलटला. हा अपघात गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पाचगणी घाटातील घटना; अपघातानंतर ट्रक उलटला
सातारा: वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकही उलटला. हा अपघात गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला.
सागर कैलास शिंदे (वय २३, रा. चांदज-आदेगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सागर शिंदे हा दुचाकीवरून वाईहून पाचगणीला निघाला होता. यावेळी पसरणी घाटातील एका मोठ्या वळणावर समोरून आलेल्या ट्रकने दुचाकीस्वार सागर शिंदेला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, सागरचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पुढे जाऊन उलटला. सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याने घाटातील वाहतूक काहीवेळ बंद होती. वाई पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक पूर्ववत केली.
खिशामध्ये सापडलेल्या आधारकार्डवरून मृत युवकाचे नाव सागर शिंदे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताची नोंद अद्यापपर्यंत वाई पोलीस ठाण्यात झाली नव्हती.