साताऱ्यात खासगी सावकारीचे दोन गुन्हे, पाच जणांच्या विरोधात तक्रार
By दीपक शिंदे | Updated: March 28, 2023 15:41 IST2023-03-28T15:41:12+5:302023-03-28T15:41:41+5:30
सातारा : सातारा शहरात खासगी सावकारीचे दोन प्रकार घडले असून याप्रकरणी पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विराेधात गुन्हा नोंद करण्यात ...

साताऱ्यात खासगी सावकारीचे दोन गुन्हे, पाच जणांच्या विरोधात तक्रार
सातारा : सातारा शहरात खासगी सावकारीचे दोन प्रकार घडले असून याप्रकरणी पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विराेधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात विशेष म्हणजे यातील संशयितांनी व्याजाचा दर ५ आणि १० टक्के इतका ठेवला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका प्रकरणात रोहित सुरेश शेंडे (रा. न्यू विकासनगर खेड सातारा) या लेबर सप्लाय व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. त्यानुसार संजय ज्ञानेश्वर जाधव (रा. सायगाव, ता. कोरेगाव) आणि अनोळखी दोघांवर गुन्हा नोंद झालेला आहे. तक्रारीनुसार हा प्रकार १४ ते २७ मार्च दरम्यान घडला आहे. तक्रारदार रोहित शेंडे यांनी व्यवसायासाठी संजय जाधव कडून वेळोवेळी ६ लाख रुपये १० टक्के व्याजाने ऑनलाइन पद्धतीने घेतले होते.
त्यानंतर शेंडेंनी संजय जाधवला मुद्दल ६ लाख आणि व्याजाचे ३ लाख ऑनलाइन पद्धतीने दिले. तरीही जाधव व अनोळखी दोघांनी तक्रारदार शेंडेंच्या घरी जाऊन पैशाची मागणी केली. तसेच पैस न दिल्यास कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे शेंडे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दुसरी तक्रार जफर गुलाम खान (रा. देवी काॅलनी, सातारा. मूळ रा. पश्चिम बंगाल) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीनंतर प्रिया नीलेश नाईक, नीलेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. हा प्रकार ४ जानेवारीला साताऱ्यातील एका रुग्णालयात घडला आहे. यातील तक्रारदार खान यांनी संशयितांकडून ६० हजार रुपये ५ टक्के व्याज दराने घेतले होते.
त्यावेळी व्याजाची रक्कम जादा असल्याने तक्रादाराने विचारणा केली. यावर संशयितांनी १०० रुपयांच्या कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेतल्या होत्या. त्यानंतर मी रुग्णालयाची इन्चार्ज आहे. मी तुझी रुग्णालयातील नोकरी घालवीन तसेच कर्ज आणि व्याज वेळच्या वेळी दिले नाही तर दिवसाला ५०० रुपये दंड द्यावा लागेल अशी धमकी देण्यात आली. त्यातच मुद्दल आणि व्याजाची रक्कम परत करण्याबाबत वारंवार मागणी करण्यात आल्याने तक्रारदार खानने सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भगवान निंबाळकर हे माहिती घेत आहेत.