Satara: पावसाचा धुमाकुळ; पुणे-बेंगळुरु महामार्गावर पाणी साचल्याने एक तास वाहतूक पडली बंद
By नितीन काळेल | Updated: May 21, 2025 18:26 IST2025-05-21T18:21:15+5:302025-05-21T18:26:31+5:30
उंब्रज/सातारा : सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यानच, आज, बुधवारी पुणे-बेंगळुरु महामार्गावर भोसलेवाडी येथे रस्त्यावर पाणी ...

Satara: पावसाचा धुमाकुळ; पुणे-बेंगळुरु महामार्गावर पाणी साचल्याने एक तास वाहतूक पडली बंद
उंब्रज/सातारा : सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यानच, आज, बुधवारी पुणे-बेंगळुरु महामार्गावर भोसलेवाडी येथे रस्त्यावर पाणी साचल्याने एक तास महामार्गावरील वाहतूक बंद पडली. वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले होते.
पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर भोसलेवाडी गावाच्या हद्दीत महामार्गाचे काम सुरू आहे. या कामामुळे रस्त्यावरुन पावसाचे पाणी बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाल्याने महामार्गावर पाणी साचले. त्यामुळे एक तास महामार्गावरील वाहतूक बंद पडली. रस्त्यावर पाणी साचून वाहतूक कोंडी होताच महामार्गाची यंत्रणा खडबडून जागी झाली. पावसातच मजुरांनी शक्य होईल तसे रस्त्यावरील पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान साचलेल्या पाण्यातूनच वाहतूक सुरु होती. उंब्रज बाजूला वाहनाची रांग लागली होती. यातच एक वाहन महामार्गावर बंद पडले त्यामुळे वाहतूक बंद पडली. हे वाहन बाजूला काढून पुन्हा वाहतूक सुरू करण्यासाठी सुमारे एक तास गेला. वाहतुकीची कोंडींमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते.
साताऱ्यात भिंत पडली, दुपारीच धो-धो; वाऱ्याने झाडे कोसळू लागली
मे महिना असला तरी जिल्ह्यातील पारा खालावला असून वळीवच पावसाळा असल्यासारखा धो-धो पडू लागला आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, दुकानात पाणी घुसणे तसेच वाऱ्याने झाडे कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. बुधवारी तर दुपारच्या सुमारासच साताऱ्यात धो-धो पाऊस पडला. त्यातच पाऊस उशिरापर्यंत पडल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.
खोलगट भागातील रस्त्यावर पाणी तुंबून राहिले. अशा पाण्यातूनच नागरिक तसेच वाहनधारकांनाही वाट काढावी लागली. शहरातील कमानी हाैद भागात एक भिंतही कोसळली. त्यातच शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचा फटका नागरिक तसेच व्यावसायिकांनाही बसत आहे.
माण तालुक्यात फळबागाचे नुकसान
माण तालुक्यात तर पावसाने दैना उडवून दिली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात पाऊस आणि वाऱ्याने डाळिंबाची झाडे आडवी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषकरून हा पाऊस फळबागधारकांसाठी नुकसानकारकच ठरलेला आहे तसेच पाटण, कऱ्हाड, कोरेगाव या तालुक्यांतही चांगला पाऊस झालेला आहे.