Satara: सलग सुट्ट्यांमुळे मलकापुरात महामार्गावर वाहतूक कोंडी, रुग्णवाहिकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:24 IST2025-09-05T15:24:11+5:302025-09-05T15:24:51+5:30
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली

Satara: सलग सुट्ट्यांमुळे मलकापुरात महामार्गावर वाहतूक कोंडी, रुग्णवाहिकांना फटका
मलकापूर : सलग सुट्ट्यांमुळे मलकापुरात महामार्गावर दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांची संख्या वाढल्यामुळे दोन्ही लेनवर वाहनांच्या रांगा लागल्याने या वाहतूक कोंडीचा स्थानिक नागरिकांसह महामार्गावर मार्गस्थ होणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.
मलकापुरात सध्या महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक उपमार्गावरून वळवण्यात आलेली आहे. पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर मलकापूर हद्दीत नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. गुरुवारी सकाळपासून मलकापुरात सलग सुट्ट्या असल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली होती. सहापदरीकरणाच्या कामामुळे अगोदरच अरुंद रस्ता व त्यातच वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी दिवसभर होती.
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग देखभाल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह महामार्ग पोलिस व कराड शहर पोलिस कर्मचारी प्रयत्न करत होते. तरीही महामार्गाच्या दोन्ही लेनवर वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ही नेहमीचीच वाहतूक कोंडी स्थानिक नागरिकांची डोकेदुखी बनत आहे. तर वाहनधारकाला आपला वेळ वाया घालविण्याशिवाय पर्यायच नाही.
वाहतूककोंडीचा रुग्णवाहिकांना फटका..
सकाळपासूनच महामार्गावर विविध कारणाने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. महामार्गाच्या दोन्ही लेनवर तीन किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीचा रुग्णवाहिकांना चांगलाच फटका बसला.