Satara: ‘पुरवठा’ पथक थेट हॉटेल, धाब्यावर; सिलिंडर ‘ब्लॅकमेलिंग’वर ‘वॉच’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 14:33 IST2026-03-17T14:31:36+5:302026-03-17T14:33:13+5:30
दिवस-रात्र धडक मोहीम सुरू : शहरात ५ ठिकाणी पोलिस बंदोबस्तात सिलिंडर वितरण सुरू

Satara: ‘पुरवठा’ पथक थेट हॉटेल, धाब्यावर; सिलिंडर ‘ब्लॅकमेलिंग’वर ‘वॉच’
कराड : सातारा जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा पडणार नाही, असे प्रशासनाकडून सांगितले जात असून, याचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यात धाड सत्र राबविले जात आहे. कराड पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिला नायकवडे यांनी पथकासह रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आणि सोमवारी दिवसभर सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे यांच्यासह कराड तालुक्यातील हॉटेल, धाब्यांना अचानक भेट दिली.
तसेच भेटीदरम्यान, काही ठिकाणी गॅस सिलिंडरचा तर साठा कोणी करत तर नाही ना? याची देखील पाहणी केली. पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाकडून धाड सत्र राबविले जात असल्याने कराड शहर व परिसरातील धाबे, हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोळसा, लाकडाची खरेदी
गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे धाबे, हॉटेल चालकांकडून थेट चुलीवर जेवण बनवण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी त्यांच्याकडून लाकडे, कोळसा खरेदी केले जात आहेत. कराड तालुक्यात जवळपास सर्वच धाबेचालकांनी लाकडे खरेदी करून आणत ती स्वयंपाक खोलीबाहेर ठेवल्याचे दिसत आहेत.
कराडच्या ‘या’ गावात गॅस सिलिंडरचे वितरण
कराड तालुक्यातील कापील, शेरे, गोटे, मुंडे, सुपने, मल्हारपेठ, उंडाळे, कोयना वसाहत, मलकापूर, सैदापूर, गोवारे, टेंभू, खोडशी, वनवासनाची, काळगाव आदी गावात संबंधित एजन्सीच्या गाड्या व कर्मचाऱ्यांद्वारे सोमवारी गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले.
‘जीवनावश्यक वस्तू कायदा’अंतर्गत होणार कारवाई
सातारा जिल्ह्यातील घरगुती गॅसचा अवैध साठा किंवा व्यावसायिक वापर करताना कोणी आढळल्यास संबंधित व्यक्तीवर ‘जीवनावश्यक वस्तू कायदा’अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
कारवाई करणारे ‘असे’ आहे पथक
१) पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिल नायकवडे
२) पुरवठा निरीक्षक राहुल शिंदे
३) पुरवठा लिपिक पूनम पाटील
४) पुरवठा लिपिक वैष्णवी लोखंडे
कराडला ५ एजन्सींवर १० पोलिसांचा बंदोबस्त
कराड शहरात सोमवारी पाच गॅस एजन्सीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्तात गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले. या ठिकाणी ग्राहकांकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, याचीदेखील पोलिस प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे.
कराड शहरात गॅस सिलिंडर वितरणामध्ये ब्लॅकमेलिंग सुरू असल्याची माहिती नागरिकांनी पुरवठा विभाग अधिकाऱ्यांसह पोलिस प्रशासनास द्यावी संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. - दत्तात्रय दराडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कराड शहर पोलिस ठाणे
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या सूचनेवर कराड शहरात व परिसरात हॉटेल, धाब्याच्या ठिकाणी रविवारी रात्री अचानक भेट देत पाहणी केली. पोलिस प्रशासनासोबत चर्चा केली असून, धडक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. - साहिला नायकवडे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, कराड