वेळे ग्रामसभेत क्रेशरच्या विषयावरून गदारोळ : सदस्यांनी सभात्याग करून सभा बरखास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 07:19 PM2019-08-22T19:19:14+5:302019-08-22T19:22:16+5:30

गावचे अनेक विषय चर्चिले असता गावच्या पाणीपुरवठ्यात टी.डी.एस. चे प्रमाण जास्त असून त्यामुळे नागरिकांना मुतखडा होण्याचे प्रमाण अधिक आहे असे स्पष्टीकरण उपसरपंच संतोष नलावडे यांनी या सभेत दिले. तसेच घनकचरा व्यवस्थापन संबंधी महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

Time crumbles on topic of Krasher in Gram Sabha | वेळे ग्रामसभेत क्रेशरच्या विषयावरून गदारोळ : सदस्यांनी सभात्याग करून सभा बरखास्त

वेळे ग्रामसभेत क्रेशरच्या विषयावरून गदारोळ : सदस्यांनी सभात्याग करून सभा बरखास्त

Next
ठळक मुद्देवेळे येथील ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद वर्चस्व मिळवून त्यांनी सत्ता स्थापन केली.

वेळे (सातारा ) :     वेळे येथे ग्रामसभेत उपस्थित करण्यात आलेल्या खडी क्रेशरच्या विषयावर जोरदार खडाजंगी होऊन संतप्त झालेल्या ग्रामसभेच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे ही ग्रामसभा बरखास्त करण्यात आली.

वेळे येथील ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद वर्चस्व मिळवून त्यांनी सत्ता स्थापन केली. 23 डिसेंबर, 2018 रोजी नवीन लोकनियुक्त सरपंच रफिक इनामदार यांनी आपला पदभार स्वीकारला. मात्र एक वर्ष पूर्ण होण्याअगोदरच त्यांना गावच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 26 जानेवारी, 2019 रोजीच्या ग्रामसभेत चर्चेला न घेतलेल्या विषयावर परस्पर मनमानी करून ठराव संमत केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला.

वेळे गावची ग्रामसभा बुधवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेण्यात आली. यावेळी ग्रामसभेचे अध्यक्षस्थान सरपंच रफिक इनामदार यांनी भूषविले. ग्रामसेवक हिंदुराव डेरे यांनी या ग्रामसभेची विषयपत्रिका वाचून दाखवली. यावेळी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करण्यात आले. त्याचबरोबर 14 व्या वित्त आयोगातील कामांबाबत सखोल चर्चा ग्रामस्थांसोबत करण्यात आली. तसेच अनेक विषयांवर देखील चर्चा झाली.

यावेळी उपसरपंच संतोष नलावडे यांनी उपस्थित सर्व सदस्यांना पूरग्रस्त कुटुंबातील पुरबळी, शहीद जवान व गावातील वैकुंठवासी व्यक्ती यांना आदरांजली वाहण्यासाठी आवाहन केले.

गावचे अनेक विषय चर्चिले असता गावच्या पाणीपुरवठ्यात  टी.डी.एस. चे प्रमाण जास्त असून त्यामुळे नागरिकांना मुतखडा होण्याचे प्रमाण अधिक आहे असे स्पष्टीकरण उपसरपंच संतोष नलावडे यांनी या सभेत दिले. तसेच घनकचरा व्यवस्थापन संबंधी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यांना मुलगी अपत्य होईल अशा मुलीसाठी तिच्या पालकांना 2500 रुपये ग्रामपंचायतीमार्फत देण्याचा निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला. तसेच रणसंग्राम मंडळातर्फे 11 हजार रुपये प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी देण्याचे मंडळाचे अध्यक्ष राहुल उर्फ अशोक ननावरे यांनी जाहीर केले.

ही ग्रामसभा खेळीमेळीत पार पडत असतानाच क्रेशरचा प्रश्न उपस्थित झाला. वेळे ग्रामपंचायतीने दिलेल्या 15 वर्षांच्या ना हरकतीवर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. मुळातच यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत कधीही क्रेशरला ना हरकत देण्याबाबत चर्चा झाली नसताना देखील ग्रामसभेच्या प्रोसिडिंग बुकमध्ये हस्तक्षेप करून मनमानी पध्दतीने ठराव लिहिण्यात आला व नियमबाह्य पध्दतीने 15 वर्षांचा ना हरकत दाखला देण्यासाठी ठराव संमत करण्यात आला, असा आरोप ग्रामस्थांनी थेट ग्रामसभेतच केला. लोकांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने चाललेला कारभार ग्रामस्थ कदापीही सहन करणार नाहीत.

2007 सालापासून वेळे येथे क्रेशर चालू आहे. या क्रेशरला ग्रामसभेची परवानगी अत्यावश्यक असते. ही परवानगी ग्रामसभेने विचार करून द्यायची असते. मात्र सत्तेचा दुरुपयोग करत मनमानी कारभार चालवत, ग्रामसभेत घेण्यात न आलेल्या विषयावर ठराव केला जातो. त्यामुळे वेळे ग्रामपंचायतीचा भोंगळ व मनमानी कारभार जनतेसमोर आला. माजी सरपंच दशरथ पवार यांनी या मुद्द्यावर ग्रामस्थांसमवेत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला. मात्र त्याला नकार देत उपसरपंच संतोष नलावडे यांनी 'झालेला ठराव पुन्हा होणार नाही' अशी जणू धमकीच दिली. या दहशतीला नागरिकांनी न जुमानता सत्तेचा गैरवापर करून जनतेला वेठीस धरणाऱ्या गावकरभाऱ्यांविरोधात आवाज उठवला. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला होता. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. नागरिकांच्या रोषाला सत्ताधाऱ्यांना सामोरे जावे लागले. गावचा संवेदनशील विषय मार्गी लावण्यासाठी कधीही नव्हती एवढी गर्दी या ग्रामसभेत होती. सरपंचाच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढत, निषेध करत सर्व ग्रामस्थानी घोषणा देत सभात्याग केला. त्यामुळे ही सभा बरखास्त करण्यात आली.

या ना त्या कारणाने सतत चर्चेत असणारे ग्रामपंचायतीचे कारभारी परस्पर स्वहिताचे निर्णय घेऊन अनागोंदी कारभार करतात. जनतेला विश्वासात न घेता ठराव संमत करून जनतेची दिशाभूल करतात. त्यांना जाब विचारण्यास गेल्यावर दहशत माजवतात. असेच ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जनहीताविरुद्ध परस्पर घेतलेले निर्णय कधीच मान्य होऊ शकत नाहीत. ग्रामसभेला असणाऱ्या अधिकारांची स्पष्ट पायमल्ली केली जात आहे. जनता आता अशा कारभाराला कधीही भीक घालणार नाही. जनतेच्या मानसिकतेत बदल झाला आहे. त्यामुळे इथून पुढे कोणत्याही प्रकारचा अनागोंदी कारभार सहन केला जाणार नाही. तसे लक्षात आल्यास कायदेशीर मार्गाने जाऊन कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन अशोक ननावरे यांनी केले.

 

 

 

जनतेचा घोर विश्वासघात करत सत्ताधारी मंडळींनी स्वहिताला प्राधान्य दिले आहे. म्हणूनच असा बेजबाबदार कारभार आता चव्हाट्यावरप आला.सत्ता ही फक्त पाच वर्षांसाठीच असते, याचेही भान सत्ताधारी मंडळींना राहिले नाही. म्हणूनच की काय पण क्रेशरला एकदम 15 वर्षांची बेकायदा परवानगी देऊन त्यांनी आपली साफ प्रतिमा जनतेला दाखवली.
----- दीपक पवार, ग्रामस्थ, वेळे

 

क्रेशरला परवानगी दिली तीच ग्रामस्थांची चूक झाली. या क्रेशरचे दुष्परिणाम हळूहळू नागरिकांना दिसू लागले आहेत. त्यासाठी दिलेली ना हरकत परवानगीही गैरमार्गाने देण्यात आली. म्हणजे गाव चालविण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. सदर क्रेशरसह इथून पुढे कोणत्याही नवीन क्रेशरला अजिबात परवानगी देण्यात येऊ नये. त्यामुळे सामान्य नागरिकांचे होणारे अपरिमित नुकसान टळणार आहे.
---- भरत पवार, ग्रामस्थ, वेळे

Web Title: Time crumbles on topic of Krasher in Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.