Satara: राधानगरीतून स्थलांतर केलेल्या 'वाघोबा'ची आता 'सह्याद्री'त डरकाळी!

By संजय पाटील | Updated: April 12, 2025 13:50 IST2025-04-12T13:49:51+5:302025-04-12T13:50:15+5:30

दुसऱ्या वाघाची नोंद : वन्यजीवने दिली ओळख; दोन्ही नर वाघांचा वावर

Tigers migrating from Radhanagari are moving in the Sahyadri Project | Satara: राधानगरीतून स्थलांतर केलेल्या 'वाघोबा'ची आता 'सह्याद्री'त डरकाळी!

Satara: राधानगरीतून स्थलांतर केलेल्या 'वाघोबा'ची आता 'सह्याद्री'त डरकाळी!

संजय पाटील

कऱ्हाड : सह्याद्री प्रकल्पात गतवर्षी पहिली नोंद झालेला ‘टी-१’ हा वाघ अद्यापही येथेच वावरतोय. त्यातच आता आणखी एक वाघ प्रकल्पात मुक्कामाला आला आहे. या दुसऱ्या वाघाचा दीर्घकाळ असलेला अधिवास लक्षात घेता वन्यजीव विभागाने त्याला ‘टी-२’ अशी विशेष ओळख देत त्याची नोंद घेतली आहे.

कोयना अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून साकारल्या गेलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी दोनशेपेक्षा जास्त कॅमेरे लावले गेले आहेत. त्या कॅमेऱ्यात यापूर्वी अनेकदा वाघांची छबी कैद झाल्या होत्या. मात्र, गतवर्षीपर्यंत येथे वावरणारे वाघ ठरावीक कालावधीनंतर दक्षिणेतील काली व्याघ्र प्रकल्पाकडे निघून गेल्याचे आढळून आले आहे.

अशातच गतवर्षी एक वाघ सहा महिन्यांपासून प्रकल्पातच वावरत असल्याचे आढळून आले. वेगवेगळ्या कॅमेऱ्यात त्याचा वावर दिसून आला. त्यामुळे त्या नर वाघाचे दीर्घकाळ वास्तव्य लक्षात घेता वन्यजीव विभागाने त्याला ‘सह्याद्री टी - १’ अशी ओळख देत त्याची नोंद घेतली.

‘सह्याद्री टी - १’ हा वाघ सुमारे दीड वर्षापासून आजअखेर प्रकल्पात मुक्कामाला असतानाच आणखी एक नर वाघ याठिकाणी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून वावरत असल्याचे नोव्हेंबर २०२४ मध्ये वन्यजीव विभागाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला ‘सह्याद्री टी - २’ अशी ओळख दिली आहे.

‘टी-२’चा राधानगरी ते सह्याद्री प्रवास

  • २०२१ : पासून ‘टी-२’ राधानगरी अभयारण्यात वास्तव्यास असल्याचे पुरावे
  • २०२४ : एप्रिल महिन्यात राधानगरीतील अधिवासाचे शेवटचे पुरावे
  • २०२४ : नोव्हेंबरमध्ये सह्याद्री प्रकल्पात ‘टी-२’ चा वावर अधोरेखित
  • २०२४ : सात नोव्हेंबरला आंबा वनपरिक्षेत्रात ‘टी-२’ प्रथमच कॅमेऱ्यात कैद
  • २०२५ : फेब्रुवारी महिन्यात वन कर्मचाऱ्यांना जवळून दर्शन


शिकार करून स्थान निश्चिती

कोणताही वाघ शिकार करून आपली उपस्थिती दर्शवितो. त्याप्रमाणेच टी-२ या वाघानेही गवा, सांबर, रानडुकराची शिकार प्रकल्पात आपली स्थान निश्चिती केली आहे. वन्यजीव विभागाने त्याच्या या शिकारीच्याही नोंदी घेतल्या आहेत.

‘टी-१’ कॅमेऱ्यात; ‘टी-२’ चे थेट दर्शन

प्रकल्पात दीड वर्षापासून वावरत असलेला ‘टी-१’ वाघ हा आतापर्यंत केवळ कॅमेऱ्यातच कैद झाला आहे. त्याचे प्रत्यक्ष दर्शन कोणालाच झालेले नाही. मात्र, ‘टी-२’ वाघाने ही उणीव भरून काढली असून वन कर्मचाऱ्यांनी दोन वेळा त्याला जवळून पाहिले आहे.

सह्याद्रीमध्ये व्याघ्र पुनर्स्थापना प्रकल्प सुरू असताना ‘टी-१’ आणि ‘टी-२’सारख्या नैसर्गिकरीत्या आलेल्या वाघांचे येथील वास्तव्य सकारात्मक ठरते. व्याघ्र संवर्धन आणि प्रकल्पाच्या भविष्यकालीन यशासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा ठरतो. - संग्राम गोडसे, वनक्षेत्रपाल, फिरते पथक, सह्याद्री

Web Title: Tigers migrating from Radhanagari are moving in the Sahyadri Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.