महाबळेश्वर येथे तीन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन युवक जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 14:24 IST2022-06-06T14:23:34+5:302022-06-06T14:24:57+5:30
मृतांमध्ये महाबळेश्वर अन् मंगळवेढ्यातील युवकाचा समावेश

महाबळेश्वर येथे तीन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन युवक जागीच ठार
सातारा : महाबळेश्वर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर महाड रस्त्यावर तीन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. यामध्ये दोन युवक जागीच ठार झाले तर दोन युवक गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये महाबळेश्वर अन् मंगळवेढ्यातील युवकाचा समावेश आहे. हा अपघात काल, रविवारी रात्री उशिरा घडला.
जुबेर मुस्तफा मानकर (वय २८, रा. नगरपालिका सोसायटी, महाबळेश्वर), आकाश तानाजी भोसले (२९,रा. मंगळवेढा, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाबळेश्वरकडून महाडच्या दिशेने (एमएच १२ सीआर ७१९३) ही दुचाकी भरधाव वेगात विरूद्ध दिशेने निघाली होती. या दुचाकीची समोरून येणाऱ्या (एमएच १२ सीडब्यू २७६७), (एमएच ११ सीआर ३७४४) या दोन दुचाकींची भीषण धडक झाली.
ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात महाबळेश्वरमधील जुबेर मानकर आणि मंगळवेढ्यातील आकाश भोसले हे दोघे जागीच ठार झाले. तर अमिन बिस्मिल्ला शेख (रा. महाबळेश्वर), व दरिबा सुनिल बळवंतराय उर्फ गोट्या (रा. मंगळवेढा) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर बेल एअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची खबर रमिज खाजा वारूणकर (रा. महाबळेश्वर) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे.