चोरीच्या तीन दुचाकी पाच रेंजर सायकल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 16:03 IST2020-01-14T16:01:55+5:302020-01-14T16:03:19+5:30
एका अल्पवयीन मुलाकडून पोलिसांनी चोरीच्या तीन मोटारसायकल आणि पाच रेंजर सायकल जप्त केल्या असून, आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

चोरीच्या तीन दुचाकी पाच रेंजर सायकल जप्त
सातारा : एका अल्पवयीन मुलाकडून पोलिसांनी चोरीच्या तीन मोटारसायकल आणि पाच रेंजर सायकल जप्त केल्या असून, आणखी बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
चोरीची दुचाकी घेऊन एकजण बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात येणार असल्याची माहिती सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टीम तयार करून कारवाईसाठी त्या ठिकाणी पाठविल्या.
या टीमने दुचाकीवरून आलेल्या संशयिताला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याची चौकशी केल्यानंतर संबंधित मुलगा अल्पवयीन असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीच्या तीन मोटारसायकल ५ रेंजर सायकल हस्तगत केल्या. त्याच्याकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सहायक पोलीस निरीक्षक संदीप वाळवेकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कदम, पोलीस नाईक शिवाजी भिसे, धीरज कुंभार, किशोर तारळकर, अभय साबळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी या कारवाईत भाग घेतला.