जिल्ह्यात तिघाजणांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:32 IST2019-04-29T22:32:04+5:302019-04-29T22:32:09+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहराच्या हद्दीतील कालव्यात वाहून जाऊन बुडून अमित रवींद्र शिंदे (वय १० रा. रहिमतपूर, ता. ...

जिल्ह्यात तिघाजणांचा बुडून मृत्यू
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहराच्या हद्दीतील कालव्यात वाहून जाऊन बुडून अमित रवींद्र शिंदे (वय १० रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) या मुलाचा मृत्यू झाला. दरम्यान, शिवेंद्र्रराजे ट्रेकर्सच्या शोध मोहिमेमुळे रात्री पावणेएक वाजता मृतदेह वाठार येथील कोंबडवाडी जॅकवेल येथे सापडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रहिमतपूर गांधीनगरमधील काही महिला रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास धुणे धुण्यासाठी रहिमतपूर-बोरगाव रस्त्यावरील बेंद नावाच्या शिवारातील कालव्यावर गेल्या होत्या. आईच्या पाठोपाठ तो मुलगाही तिथे पोहोचला. सध्या कालव्याला जास्त प्रमाणात पाणी सोडले आहे. अमित शिंदे हा कालव्यावर खेळता-खेळता पाय घसरून पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तो पाण्यातून वाहून गेला. याची माहिती तत्काळ रहिमतपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी स्थानिक लोकांना बरोबर घेऊन त्या मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा शोध लागत नव्हता. रहिमतपूरचे पोलीस पाटील दीपक नाईक व पोलिसांनी शिवेंद्रराजे ट्रेकर्सला पाचारण केले. ट्रेकर्सचे चंद्रसेन पवार यांच्यासह त्यांच्या सहा जणांच्या टीमने शोध मोहीम राबवली. रात्री पावणे एकच्या सुमारास वाठार येथील कोंबडवाडी जॅकवेलजवळ अमित शिंदे याचा मृतदेह सापडला. रहिमतपूर पोलीस ठाण्यात नोंद झाली .
धोम डाव्या कालव्यात मुलाचा मृतदेह
वाई : धोम डाव्या कालव्यात देगाव गावाच्या हद्दीत सोमवारी दुपारी एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला. गौरव प्रकाश चव्हाण (वय १०, रा़ वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई) मृत मुलाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, गंगापुरी येथील यात्रा मैदानावर मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहण्यासाठी गौरव रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गेला. सोमवारी सकाळपर्यंत तो घरी न परतल्याने त्याच्या पालकांनी वाई पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली. दरम्यान, दुपारी देगावच्या हद्दीत धोम कालव्यामध्ये काही नागरिकांना गौरवचा मृतदेह आढळून आला.
याबाबत माहिती मिळताच नातेवाइकांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता संबंधित मृतदेह हा गौरवचाच होता़ आई अश्विनी प्रकाश चव्हाण (वय २८, रा. वाई) यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली होती़ अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सी. आर. कदम करीत आहेत़
पाण्याच्या टाकीत पडल्याने मृत्यू
तरडगाव : तरडगाव ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीत पडल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. भानुदास कानडे असे मृत व्यक्तीचे नाव आहेत. लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.