Satara News: यात्रेला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; रिक्षा-ट्रॅक्टरचा भीषण अपघात, कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू
By प्रमोद सुकरे | Updated: March 11, 2023 17:09 IST2023-03-11T15:56:38+5:302023-03-11T17:09:11+5:30
तर मुलगा गंभीर जखमी झाला

Satara News: यात्रेला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; रिक्षा-ट्रॅक्टरचा भीषण अपघात, कोल्हापूर जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू
उंडाळे : पुण्यावरुन गावी यात्रेला रिक्षाने निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. कऱ्हाड चांदोली मार्गावर येणपे लोहारवाडी येथे रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघातात तिघे जागीच ठार झाले तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात रिक्षा चालक त्याची पत्नी व मुलगी ठार झाले आहेत तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
अपघातात ठार झालेले तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील पनुंबरे गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती कराड तालुका पोलिसांनी दिली आहे. सुरेश सखाराम महारुगडे, सुवर्णा महारुगडे अशी मृताची नावे आहेत. यांच्यासह त्यांच्या मुलीचाही मृत्यू झाला. या घटनेने शाहूवाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
अपघातात एक १० वर्षाचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कऱ्हाड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सदर कुटुंब गावाकडे यात्रेला निघाले होते. दरम्यान, या कुटुंबावर काळाने घाला घातला. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास तालुका पोलिस करीत आहेत.