आगाशिवनगर झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट, तीन झोपड्या जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 13:05 IST2019-02-26T13:04:42+5:302019-02-26T13:05:52+5:30
आगाशिवनगर, ता. कऱ्हाड येथील झोपडपट्टीतील दांगटवस्तीत अचानक लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये तीन झोपड्या जळून खाक झाल्या. मंगळवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.

आगाशिवनगर झोपडपट्टीत सिलेंडरचा स्फोट, तीन झोपड्या जळून खाक
मलकापूर : आगाशिवनगर, ता. कऱ्हाड येथील झोपडपट्टीतील दांगटवस्तीत अचानक लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये तीन झोपड्या जळून खाक झाल्या. मंगळवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. मात्र, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दांगटवस्ती येथील झोपडपट्टीत ४ राहणारे कुटुंबीय नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून कामावर गेले होते. यावेळी मंगळवारी अचानक झोपडीतील पत्र्याच्या शेडच्या घरातून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. काही कळण्यापूर्वीच झोपडीत सिलेंडरचा अचानक स्फोट झाला.
स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी घटना घडलेल्या घराशेजारी असलेल्या इतर घरांतील सिलेंडर प्रसंगावधान राखून युवकांनी बाहेर काढले. तसेच आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
या घटनेची माहिती कऱ्हाड पालिका व कृष्णा रूग्णालयातील दोन अग्निशामक दलास दिली. त्यानंतर अग्निशामक दलासोबत लगतच्या एका कंपनीतील अग्निशामक यंत्रणेद्वारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली गेली. यावेळी युवकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानाने पुढील अनर्थ टळला.