Satara: तेरा कोटींच्या अपहारप्रकरणी ‘शिवशंकर’ पतसंस्थेच्या तीन संचालकांना पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 17:20 IST2024-06-29T17:19:51+5:302024-06-29T17:20:48+5:30
पाच संचालक गजाआड : संचालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

Satara: तेरा कोटींच्या अपहारप्रकरणी ‘शिवशंकर’ पतसंस्थेच्या तीन संचालकांना पोलिस कोठडी
कऱ्हाड : शहरातील शिवशंकर नागरी पतसंस्थेतील तेरा कोटींच्या अपहारप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी तीन संशयित संचालकांना गजाआड केले आहे. तसेच याप्रकरणी अकरा संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. यू. एल. जोशी यांनी फेटाळले आहेत. यापूर्वी या प्रकरणात दोन संचालकांना अटक झाली होती. त्यामुळे याप्रकरणी अटक झालेल्या संचालकांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
शहरातील शिवशंकर नागरी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी २८ जणांवर गुन्हा दाखल आहे. एप्रिल २०२४ मध्ये विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. उमेश वसंतराव मुंढेकर (वय ६६, रा. शनिवार पेठ), सतीश चंद्रकांत बेडके (वय ५४, रा. तेलीगल्ली, शनिवार पेठ), मनोज चंद्रकांत दुर्गवडे (वय ४२, रा. यशवंत हायस्कूल मागे, शनिवार पेठ, मूळ रा. मोरगिरी, ता. पाटण) यांना बुधवारी रात्री ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. या तिघा संशयितांना दि. १ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी याप्रकरणी शरद गौरीहर मुंढेकर आणि सुनील आनंदा काशीद या दोघांना अटक करण्यात आली होती.
विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीतील लेखापरीक्षण झाल्यानंतर १३ कोटी ९ लाख ९६ हजारांचा अपहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अटक टाळण्यासाठी अकरा जणांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे अन्य संशयितांना लवकरच अटक होईल, असे पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी सांगितले.